काकडी आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बहुतेक सेलिब्रिटींच्या डायट प्लॅनमध्ये काकडीचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. काकडीचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करु शकतो, जसे कोशिंबीर, ज्यूस, सॅँडवीच किंवा मीठ लावूनही सेवन करु शकता. काकडीमध्ये अनेक आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आहेत. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही काकडीचा फ्रेशनेससाठी उपयोग करण्यात येतो. तुम्ही काकडीचा स्प्रे तयार करू शकता. काकडीपासून तयार करण्यात आलेला स्प्रे तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत करेल. जाणून घेऊयात काकडीचा स्प्रे तयार करण्याती प्रक्रीया...
साहित्य :
- काकडीचा अर्धा तुकडा
- एक चमचा लिंबू
- एक चमचा गुलाबपाणी
- एक चमचा कोरफडीचा गर
- स्प्रे बॉटल
कृती :
- सर्वात आधी काकडीचा तुकडा घ्या. त्याची साल काढून मिक्सरमध्ये बारिक करून पेस्ट तयार करा.
- त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून रस वेगळा करून घ्या.
- या रसामध्ये लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करा.
- तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये ओतून फ्रिजमध्ये ठेवा.
- या स्प्रेचा वापर केल्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल.
काकडीचे इतरही फायदे -
- आजकाल काकडी प्रत्येक सीझनमध्ये मिळते. काकडीमुळे देखील चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते. काकडीचे छोटे छोटे काप करून डाग असलेल्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटे ठेवा. अर्धा तासानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
- दिवसभराचा कामाचा ताण किंवा अपूर्ण झोप यांमुळे अनेकदा डोळ्यांना थकवा जाणवतो. अशावेळी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळ नष्ट होण्यासही मदत होते.
- काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. परिणामी त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते.
- चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवल्यास काकडीचा रस त्यावर लावल्यामुळे ही समस्या दूर होते.
- त्वचेसाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर असतं. काकडीमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे काकडीचा आहारात समावेश केल्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.