(Image Credit : www.youreyesite.com)
डोळ्यांच्या तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे १ मिनिटामध्ये एका व्यक्तीच्या पापण्या १० वेळा उघडझाप होतात. पण तुमच्या पापण्या यापेक्षा कमी वेळा उघडझाप होत असतील तर ही धोक्याची घंटा असू शकते. बहुदा कम्प्युटरवर काम करणारे, टीव्ही बघणारे किंवा मोबाईलचा अधिक वापर करणारे लोक पापण्यांची उघडझाप कमी करतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पापण्यांची उघडझाप न करणेही डोळ्यांसाठी घातक आहे आणि या कारणाने डोळ्यांशी संबधित समस्या होऊ शकतात. ड्राय आय सिंड्रोम डोळ्यांचा असा आजार आहे जो डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघडझाप केल्याने होतो.
यासाठी पापण्यांची हालचाल महत्त्वाची
निरोगी डोळ्यांच्या पापण्या नेहमी भिजलेल्या किंवा ओल्या असतात. डोळ्यांच्या पापण्यांवर एक खासप्रकारचं लिक्विड असतं. जे लुब्रिकंटप्रमाणे काम करतं. जेव्हा तुम्ही पापण्या खाली-वर करता तेव्हा लुब्रिकंट चांगल्याप्रकारे पसरतं. याने डोळ्यांचा ओलावा कायम राहतो. याउलट जेव्हा तुम्ही डोळ्यांची कमीवेळा उघडझाप करता तेव्हा लुब्रिकंट चांगल्याप्रकारे काम करत नाही. याने डोळे कोरडे होतात. यालाच ड्राय आय सिंड्रोम म्हटले जाते.
ड्राय आय सिंड्रोम घातक
ड्राय आय सिंड्रोम हा आजार फार घातक ठरु शकतो. याने डोळ्यात अश्रू तयार होणे कमी होतं किंवा त्यांची गुणवत्ता चांगली राहत नाही. अश्रू हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याने डोळे कोरडे होत नाहीत. तसेच आपल्या डोळ्यांमध्ये एक टिअर फिल्म असते, ज्याच्या सर्वात वरच्या आवरणाला लिपिड किंवा ऑयली लेअर म्हटलं जातं. हीच लिपिड लेअर अश्रू जास्त वाहण्यापासून, अश्रू सुकण्यापासून वाचवतात. लिपिड किंवा हीच ऑयली लेअरच डोळ्यांच्या पापण्यांना लवचिकता देते ज्याने डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणे सोपे होते.
लक्षणे
- डोळ्यांमध्ये जळजळ होणे
- डोळ्यांमध्ये रुतल्यासारखे वाटणे
- डोळे कोरडे होणे
- डोळ्यांमध्ये खाज येणे
- डोळ्यांना जडपणा वाटणे
- डोळे लाल होणे