भारतीय महिलांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2016 9:23 AM
५४ टक्के डॉक्टरांना असे वाटते की, मागच्या पाच वर्षांमध्ये महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण १६ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.
हृदयविकार ही जागतिक समस्या आहे. परंतु आजही भारतामध्ये याविषयी पुरेक्षी दक्षता बाळगली जात नसल्याचे दिसून येते. खास करून महिला याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करतात. देशातील विविध शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे.महिलांच्या आरोग्याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची त्यांनी सांगितले. तरुण वयातदेखील महिलांना हृदयविकार होऊ शकतात यावर अनेकांना विश्वास बसत नाही. म्हणून वेळीच निदान न झाल्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण देशात झपाट्याने वाढत आहे.तरुण वयात हृदयरोगाची लक्षणे ओळखणे तसे कठीण असते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळे लक्षणे आणि कारणे यासाठी कारणीभूत असू शकतात. गर्भनिरोधक गोळ्या, धुम्रपान याबरोबरच मेनोपॉज यासारख्या कारणामुळे महिलांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे हृदयविकार तज्ज्ञ प्रफुल केरकर यांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी बंगळूरु येथे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ५७७ पैकी ८३ टक्के हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले की, बहुतांश भारतीय महिला हृदयविकारांविषयी अनभिज्ञ आहेत. ७६ टक्के डॉक्टरांना वाटते उपचारांमध्ये दिरंगाई किंवा उशिरा झालेल्या निदानामुळे अधिक महिलांचा मृत्यू होतो. ५४ टक्के डॉक्टरांना असे वाटते की, मागच्या पाच वर्षांमध्ये महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण १६ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.