(Image creadit : trocobuy.com)
सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. महागड्या पार्लर ट्रिटमेंट, बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं यांसारख्या गोष्टींचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. पण यांसारख्या उपायांनी त्वचेला फायदा होत असला तरीदेखील त्यांमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे त्वचेच्या अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेच्या समस्यांसाठी केमिकल्स नसलेल्या गोष्टींचा वापर करणं फायदेशीर ठरतं. घरामध्ये रोज वापरणाऱ्या गोष्टींपैकी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांचा वापर आपण त्वचेला उजाळा देण्यासाठी किंवा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी करू शकतो. त्यांपैकी एक म्हणजे स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारं लिंबू. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटमिन सी आणि व्हिटॅमिन बी आढळून येते. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्कीन, ब्लॅकहेड स्वच्छ करण्यासोबतच चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद करण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
चेहरा उजळवण्यासाठी -
अनेकदा प्रदुषण आणि घाणीमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशावेळी चेहऱ्याची त्वचा खुलवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करून तयार केलेला फेसपॅक वापरणं उपयुक्त ठरतं. फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 मिनिटं सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.
बॉडी स्क्रब -
लिंबापासून स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप ऑलिव्ह ऑईल, अर्धा कप साखर आणि एक चमचा मध आणि लिंबू मिक्स करा. याची पेस्ट तयार करून 10 मिनिटांसाठी शरीरावर लावा. त्यानंतर पाण्याने आंघोळ करा.
हातांच्या त्वचेसाठी -
एका टॉमेटोचा रस, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन सारख्या प्रमाणात घेऊन एकत्र करा. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तयार केलेल्या पेस्टने हातांवर मालिश करा आणि 10 मिनिटांसाठी ही पेस्ट हातांवर राहू द्या. त्यानंतर हात धुवून टाका. यामुळे हातांसोबतच नखंही चमकदार होण्यास मदत होईल.
ब्लॅक हेड्स -
एक चमचा लिंबाच्या रसामध्ये तुळशीची पानं वाटून घ्या. त्यानंतर तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्सची समस्या दूर होईल.
अंडरआर्मच्या त्वचेसाठी -
बऱ्याचदा वारंवार वॅक्स केल्यामुळे अंडरआर्मची त्वचा काळी पडते. अशावेळी काळी त्वचा उजळवण्यासाठी लिंबाचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. काळ्या पडलेल्या त्वचेवर लिंबाचा रस कापसाच्या बोळ्याने लावा. असे आठवड्यातून दोनदा केल्याने हळूहळू त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होईल.
टिप : वरील उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. अनेकदा काही लोकांना पदार्थांची अॅलर्जी होण्याची शक्यता असते.