लिंबाचे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी किती फायदे होतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लिंबामुळे आपली इम्यूनिटी वाढते आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं. सोबतच वजन कमी करण्यासही याने मदत होते. इतकेच नाही तर आपण जे खातो त्याला एक वेगळी चवही लिंबामुळे मिळते. मात्र, लिंबाचा रस अधिक सेवन केल्याने तुमचे दातही खराब होऊ शकतात.
दातांचं कसं होतं नुकसान?
फार जास्त लिंबू पाणी प्यायल्याने दातांचं नुकसान होतं. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, अशी फळं ज्यात सायट्रिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं, त्यांच्या रसाने किंवा ज्यूसने दातांचं नुकसान होतं.
संत्री, लिंबू, पपनस आणि इतरही काही हंगामी फळं ही सायट्रिक अॅसिडचे स्त्रोत असतात. या सर्वच फळांची टेस्ट आंबट असते. सायट्रिक अधिक असलेलं फळ कोणतं हे ओळण्यासाठी ही पद्धत सोपी आहे. लिंबाचा रस किंवा संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने दात कमजोर होतात.
आंबट फळांमध्ये असलेल्या सायट्रिक अॅसिडने आपल्या दातांचं आवरण म्हणजेच टूथ एनेमल कमजोर होतं. यामुळे दातांची चमक किंवा पांढरेपणा कमी होतो. तसेच दातांवर डागही दिसू लागतात.
कशी घ्याल काळजी?
वेगवेगळ्या रिसर्चनुसार, फार जास्त प्रमाणात लिंबाचा रस किंवा आंबट फळांचं सेवन केल्याने सायट्रिक अॅसिड अधिक प्रमाणात दातांच्या संपर्कात येतं. रोज एक ग्लास लिंबाचा रस पिणाऱ्यांनी याबाबत चिंता करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे कमी प्रमाणात संत्र्याचा किंवा मोसंबीचा ज्यूस प्यायल्यानेही या नुकसानापासून बचाव केला जाऊ शकतो.
सायट्रिक अॅसिडच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी आणि याचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस इतर फळांच्या ज्यूसमध्ये टाकून सेवन करू शकता. त्याचप्रमाणे केवळ संत्री-मोसंबीचा ज्यूस सेवन करण्याऐवजी तुम्ही सफरचंद, अननस किंवा इतरही फळांसोबत लिंबाचा ज्यूस मिश्रित करून सेवन करू शकता.