सिगारेटचे व्यसन सोडण्यास एक मेसेजही पुरेसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2016 10:09 AM
‘तु हे करू शकतो’, ‘धैर्य दाखव’ अशा प्रकारचे प्रेरणादायी सकारात्म मेसेजमुळे व्यसन सुटण्यास मदत होते
तंबाखू-सिगारेटचे व्यसन सुटता सुटत नाही. कित्येक जण ठरवूनही त्यांचे व्यसन सोडण्यात अयशस्वी ठरतात.तुमच्या प्रियजणांपैकी जर कोणाला हे व्यसन असेल आणि तुम्ही ते सोडण्यास मदत करून इच्छित असाल तर एक छोटीशी गोष्ट तुम्ही जरूर करा. त्या व्यक्तीला व्यसन सोडण्यास प्रवृत्त करणारे मेसेज पाठवा. ‘तु हे करू शकतो’, ‘धैर्य दाखव’ अशा प्रकारचे प्रेरणादायी सकारात्म मेसेजमुळे व्यसन सुटण्यास मदत होते, असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे.व्यसनमुक्तीच्या या मेसेज थेरपीमुळे (मेसेजिंग इंटरव्हेन्शन) लोक सिगारेटपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी होतात. म्हणजेच एक साधा मेसेजही तुमच्या प्रियजणांना या अतिघातक व्यसनाच्या विळाख्यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतो.दहा देशांत वापरण्यात येणाऱ्या 22 प्रकारच्या मेसेजिंग इंटरव्हेन्शन्सचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. या इंटरव्हेन्शनमध्ये आरोग्यविषयक माहिती, व्यसनापासून दूर राहण्याची आठवण आणि तुमचा सपोर्ट दर्शविण्यात येतो. सहज परिस्थितीमध्ये व्यसन सोडविण्यासाठी मेसेजिंग इंटरव्हेन्शन्सचा खूप उपयोग होतो.अमेरिकेतील ब्राऊन विद्यापिठातील लोरी स्कॉट-शेल्डन यांनी माहिती दिली की, सिगारेटचे व्यसन सोडविण्याकरिता मेसेजिंग इंटरव्हेन्शन्स खूप लाभदायक थेरपी आहे असे आमच्या संशोधनातून दिसून आले. परंतु या संदर्भात अधिक संशोधन करण्याची गरज आहे. कोणासाठी ही थेरपी उपयोगी आहे, कोणत्या परिस्थितीत यामुळे सर्वोत्तम परिणाम दिसून येतात आणि ते कशामुळे याचा सखोल अभ्यास करूनच ठोस निष्कर्षापर्यंत येणे संयुक्तिक ठरेल. कमी खर्चात आणि उपलब्ध संसाधनांद्वारे व्यापक प्रमाणात सिगारेटच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी मेसेज थेरपीचा खूप चांगला पर्याय निर्माण झाला आहे. आरोग्यविषयक धोरणांमध्यो याला अधिक प्राधान्य देण्याच गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.