Amla Oil For Hair Growth: लांब, दाट आणि काळे केस असावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण आजकालच्या खाण्या-पिण्याच्या काही चुकींमुळे किंवा चुकीच्या लाइफस्टाईलमुळे केस कमी वयातच पांढरे होतात. अशात ही समस्या दूर करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो. आवळ्याच्या तेलामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची वाढही होते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आवळ्याच्या तेलामध्ये कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने जास्त फायदा मिळतो.
मेथीचे दाणे आणि आवळा तेल
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड असतं, जे केसांना मुळापासून पोषण देतात आणि केसांची वाढ करतात. आवळा तेलामध्ये मेथीचे दाणे मिक्स करून लावल्याने केसगळतीची समस्या देखील कमी होते. यासाठी २ ते ३ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे दाणे बारीक करून आवळ्याच्या तेलात टाका. हे तेल केसांच्या मुळांना लावा आणि ३० ते ४० मिनिटे तसंच ठेवा. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या.
एलोव्हेरा आणि आवळ्याचं तेल
एलोव्हेराने केस मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. तसेच यातील पोषक तत्वांमुळे केसांची वाढही होते. इतकंच नाही तर केसगळतीची समस्या देखील याने दूर होते. एलोव्हेरामधळी पोषक तत्वांमुळे केसांमधील कोंडाही निघून जातो. यासाठी ताज्या एलोव्हेराचं जेल घ्या आणि त्यात आवळ्याचं तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. काही वेळ हलक्या हाताने मालिश करा. एक तासानंतर केस धुवून घ्या.
कढीपत्ता आणि आवळा तेल
कढीपत्ता केसांचा नॅचरल रंग कायम ठेवण्यास फायदेशीर ठरतो. कमी वयात केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी याची मदत मिळते. आवळ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करून लावल्याने केसांची वाढही होते. यासाठी काही कढीपत्त्याची काही पाने आवळा तेलात टाकून गरम करा. जेव्हा पाने काळे होतील तेव्हा गाळून घ्या. थंड झाल्यावर केसांना लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.
कांद्याचा रस आणि आवळा तेल
कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं, जे केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर असतं. आवळ्याच्या तेलात आणि कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास केसांच्या मुळात ब्लड फ्लो वाढतो, ज्यामुळे केस वाढतात. यासाठी एका कांद्याचा रस घ्या आणि तो आवळ्याच्या तेलात मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस धुवून घ्या.