रात्री उशीरापर्यंत जागणं, तणाव, मोबाईल आणि कम्प्युटरवर सतत काम करणं, संतुलित आहाराची कमतरता, सकाळी लवकर उठणं सध्याच्या या धावपळीच्या युगात लोकांची ही लाइफस्टाइल आहे. या अनियमित दिनचर्येमुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच सर्वांत कॉमन समस्या म्हणजे, डार्क सर्कल्स. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्याच्या आड येतात. यापासून बचाव करण्यासाठी कोणतंही आय क्रिम लावण्याऐवजी आय मास्कचा वापर करा. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. काही असेही नॅचरल आय मास्क आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही डार्क सर्कल्स दूर करू शकता. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्यासोबतच चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत होते.
दूधापासून तयार करण्यात आलेला मास्क
दूधापासून तयार करण्यात आलेला मास्क आपल्या लाइटनिंग प्रॉपर्टीमुळे डार्क सर्कल्सची समस्या दूर करतो. त्यासाठी तुम्हाला दूधासोबत मिल्क क्रिमचीही गरज भासते. एक चमचा मिल्क क्रिममध्ये चार ते पाच थेंब दूध एकत्र करून कॉटनच्या मदतीने डोळ्यांच्या खालच्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका.
बदामाचं तेल आणि मधापासून तयार केलेला मास्क
बदामाचं तेल आणि मधापासून तयार केलेला मास्क त्वचा हायड्रेट करण्यासाठी मदत करतो. तसेच हा मास्क तुम्हाला सुरकुत्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. त्यासाठी एक छोटा चमचा बदामाच्या तेलामध्ये एक चमचा मध एकत्र करून डोळ्यांच्या खालच्या त्वचेवर लावा. 5 ते 10 मिनिटांपर्यंत असचं ठेवा आणि त्यानंतर पाण्याच्या मदतीने धुवून टाका. काही दिवसांसाठी हे दररोज करा.
काकडीपासून तयार करण्यात आलेला मास्क
डार्क सर्कल्ससोबतच पफी आइजपासून सुटका करण्यासाठी काकडीपासून तयार करण्यात आलेला मास्क मदत करतो. यासाठी अर्धी काकडी किसून घेऊन त्याचा रस काढा. त्यामध्ये एक चमचा गुलाबपाणी एकत्र करून कॉटनच्या मदतीने डोळ्यांच्या खाली लावा. सुकल्यानंतर हे पाण्याच्या मदतीने धुवून टाका.
टोमॅटो किंवा लिंबाच्या रसापासून तयार करण्यात आलेला मास्क
डार्क सर्कल्स वर उपाय म्हणून हा मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टी असतात. ज्या डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासाठी यामध्ये दोन चमचे लिंबाच्या रसामध्ये एक चमचा पाणी एकत्र करून कॉटन बॉलच्या मदतीने डोळ्यांच्या खाली लावा. पाच मिनिटांनंतर पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.