Hair Care: त्वचा किंवा केसांची काहीही समस्या झाली की, लोक जुन्या काळातील वेगवेगळे घरगुती उपाय सगळ्यात आधी करतात. आजी-आजोबांनी सांगितलेले हे उपाय फार फायदेशीर ठरत असतात. न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांचाही त्यांच्या आजीच्या उपायांवर विश्वास आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी केसांच्या वाढीसाठी एका हेल्दी ड्रिंकबाबत सांगितलं आहे. त्यांनी हे ड्रिंक बनवण्याची पद्धतही सांगितली आणि केसगळती कशी कमी होईल हेही सांगितलं.
केस वाढण्याचा उपाय
हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी तुम्हाला एक कप दही, २ चमचे सत्तू पावडर, चिमुटभर सैंधव मीठ, ५ ते ६ कढीपत्ते आणि २०० मिलीलीटर पाणी हवं. या सगळ्या गोष्टी एकत्र करून हे ड्रिंक तयार करावं लागेल. सकाळी या ड्रिंकचं सेवन तुम्ही करू शकता.
हे उपायही ठरतात फायदेशीर
- केस वाढवण्यासाठी काही घरगुती उपायच जास्त फायदेशीर ठरतात. केळी, अंडी आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून तुम्ही एक हेअर मास्क तयार करू शकता. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. हा हेअर मास्क तुम्ही महिन्यातून दोन वेळा केसांवर लावू शकता.
- खोबऱ्याच्या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने गरम करा आणि हे तेल केस धुण्याच्या एक तास आधी केसांवर लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. याने केस दाट आणि मजबूत होण्यास मदत मिळेल.
- कॅस्टर ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईलही केसांवर लावलं जाऊ शकतं. त्याशिवाय कांदा खोबऱ्याच्या तेलामध्ये गरम करून हे तेल केसांवर लावू शकता. यानेही केस चांगले वाढतात.