दररोज ऑफिसला जाण्याची तयारी करायची असो किंवा एखाद्या समारंभासाठी, उत्सवासाठी ड्रेस, मेकअप अशा सगळ्या तयारीचा शेवट होतो तो परफ्युमनं (Perfume). परफ्युम लावल्याशिवाय कोणाची तयारी पूर्ण होत असेल असं वाटत नाही. वेगवेगळे सुगंध असणारे परफ्युम्स मन प्रसन्न करतात. त्यामुळे सकाळी कामावर जाताना प्रत्येकजण आपल्या आवडीच्या सुवासाचा परफ्युम लावून बाहेर पडणं पसंत करतात. यामुळे मन दिवसभर ताजंतवानं राहतं. परफ्युमच्या मंद सुवासामुळे वातावरणही प्रसन्न राहतं. मुंबईसारख्या ठिकाणी तर घामाचा त्रास खूप होतो, अशावेळी परफ्युम खूपच महत्त्वाचा ठरतो. पार्टी, समारंभ अशा ठिकाणी जिथे अनेक लोकांशी आपला संपर्क येतो अशावेळी परफ्युम वापरणं तर अत्यावश्यक ठरतं.
बाजारपेठेत आपल्याला अनेक प्रकारचे परफ्युम्स मिळतात. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स असतात. परफ्युमचा गंध दीर्घकाळ दरवळत राहावा जेणेकरून आपल्याला आणि आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांनाही प्रसन्न वाटेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण बाहेरच्या वातावरणातील धूर, धूळ, घाम यांच्या तीव्र माऱ्यातून परफ्युमचा सुगंध टिकून राहणे कठीण असल्याचा अनुभव अनेकदा येतो.
मीडिया अहवालानुसार, ही समस्या एका साध्या सोप्या उपायाने दूर करता येते असा दावा एका टिकटॉक युजरने केला आहे. हा उपाय आहे पेट्रोलियम जेलीचा (Petorleum Jelly). पेट्रोलियम जेली आणि परफ्युमचा सुगंध टिकून राहण्याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल ना? पण पेट्रोलियम जेली तुमच्या परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करते, असं यामध्ये म्हटलं आहे. द गार्डियन डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एका टिकटॉक (Tiktok) युजरने याबाबत माहिती दिली असून, पेट्रोलियम जेली युक्त मॉईश्चरायझर (Moisturizer) वापरल्यामुळे परफ्युम दीर्घकाळ टिकू शकतो, असा दावा यात केला गेला आहे. परफ्युममध्ये अल्कोहोल (Alcohol) असतं त्यामुळे हवेचा संपर्क आल्यावर ते उडून जातं. परिणामी वेळ निघून जातो तसा परफ्युमचा वास कमी कमी होत जातो. अस्सल परफ्युमची किंमतही खूप महाग असते आणि असे महागडे परफ्युम त्वचेवर लावल्यानंतरही ते काही काळाने हवेत उडून जातात. त्यामुळे त्याचा सुवास संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत टिकून राहावा यासाठी पुन्हापुन्हा तो लावणं शक्य नसते. यामुळं एकदा लावलेला परफ्युम दीर्घकाळ टिकून राहावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पेट्रोलियम जेली उपयुक्त ठरते, अशी ही हॅक आहे.