चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही फारच सामान्य पण गंभीर समस्या आहे. याचा सामना जवळपास सर्वांनाच करावा लागतो. पण कधी कधी यावर वेगवेगळे उपाय करूनही यापासून सुटका मिळू शकत नाही. पिंपल्स येण्याचं सर्वात मोठं कारण आहे त्वचेतून तेल येणे. त्यासोबतच योग्य आहार न घेणे, हार्मोन्सचं असंतुलन आणि अस्वच्छता हेही याची महत्त्वाची कारणे आहेत. पण यावर एक घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आइस क्यूबच्या मदतीने पिंपल्स कसे दूर करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पिंपल्स दूर करण्यासोबतच याने सूजही दूर होऊ शकते.
आइस पॅक
सर्वातआधी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडा होऊ द्या. आता आइस क्यूब घ्या आणि एका स्वच्छ कापडामध्ये गुंडाळा. आता हे पिंपल्सवर ५ मिनिटांसाठी लावून ठेवा. थोडा आराम घ्या आणि पुन्हा ५ मिनिटांसाठी आइस क्यूब पिंपल्सवर लावा. बर्फ पूर्णपणे वितळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही ही प्रक्रिया करू शकता.
लेमन आइस क्यूब
लिंबाचा रस पिंपल्सच्या बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतो. यासाठी आधी लिंबाचा रस काढा. नंतर त्यात दोन कप पाणी घाला. हे मिश्रण आइस ट्रेमध्ये टाका आणि थंड होऊ द्या. तयार झालेली आइस क्यूब चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. जिथे पिंपल्स आहेत तिथे आइस क्यूब लावा. या मिश्रणात तुम्ही काही थेंब मधही घालू शकता.
बेकिंग सोडा आणि आइस क्यूब
बेकिंग सोड्यानेही पिंपल्स दूर करण्यास मदत होते. बेकिंग सोड्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात काही थेंब पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावा. २५ मिनिटे हे चेहऱ्याला तसंच लावून ठेवा. नंतर बर्फाचा तुकडा घेऊन त्यावर हलक्या हाताने फिरवा. आठवड्यातून तिनदा हा उपाय करा.
टी ट्री ऑयल आणि आइस क्यूब
टी ट्री ऑइल अॅंन्टीफंगल, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटीसेप्टिक असतं. यामुळे त्वचेवरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. याचं मिश्रण तयार करण्यासाठी ¼ कप पाण्यात ५ ते ६ थेंब टी ट्री ऑइल टाका. आता चेहऱ्याची बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. यावेळी जास्त फोकस हा पिंपल्सवर असावा. त्यानंतर टी ट्री आइलचं मिश्रण प्रभावित जागेवर लावा आणि ५ मिनिटे तसंच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
मुलतानी मातीची पेस्ट आणि आइस क्यूब
पिंपल्स आणि पुरळ दूर करण्यासाठी ही पेस्ट फायदेशीर असते. ही पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, एक चमचा मुलतानी माती आणि लिंबाचा रस घ्या. आधी चेहरा धुवा आणि पिंपल्सवर पेस्ट लावा. ही पेस्ट कोरडी होऊ द्या. आता बर्फाचा तुकडा घेऊन यावर ५ मिनिटे मसाज करा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.