अँटिबायोटिक्सचा मेंदूवर दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2016 11:07 AM
अँटिबायोटिक्सचा दीर्घकाळ उपचार घेतल्यामुळे मेंदूची कार्यप्रणाली बिघडते.
आपल्या मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी आतड्यांतील काही लाभदायक जंतू (हेल्दी गट बॅक्टेरिआ) अतिशय गरजेचे असतात.अशा लाभदायक जंतूंना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) नुकसान पोहचवितात. नव्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, अँटिबायोटिक्सचा दीर्घकाळ उपचार घेतल्यामुळे मेंदूची कार्यप्रणाली बिघडते.आतडे आणि मेंदूचा हार्मोन्स (संप्रेरके), मेटाबोलिक प्रोडक्ट, आणि मज्जासंस्थेच्या थेट कनेक्शनद्वारे संपर्क होत असतो. एका विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशी (इम्यून सेल) गट बॅक्टेरिआ आणि मेंदू यांचा दुवा म्हणून काम करत असतात. उंदरावर केलेल्या प्रयोगात, अँटिबायोटिक्सची उच्च मात्रा देऊन उंदराचे गट बॅक्टेरिआ मारणयात आले. त्यानंतर सामान्य उंदरांशी तुलना केली असता प्रयोग केलेल्या उंदरांच्या मेंदूच्या हिपोकॅम्पस भागात कमी प्रमाणात नव्या चेतापेशी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीदेखील घटली.मानवांवर जरी हे निष्कर्ष थेट लागू पडत नसले तरी संशोधकांनी अँटिबायोटिक्सच्या दुष्परिणामांचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली आहे. मॅक्स डेलब्रुक सेंटर फॉर मोलेक्युलर मेडिसिन येथील संशोधक सुझैन वुल्फ यांनी माहिती दिली की, दीर्घकाळ अँटिबोयोटिक्सचा वापर केल्यावर कदाचित अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.