ये रेशमी जुल्फे...!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 6:16 PM
महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस होय. केस सुंदर असणे महत्त्वाचे नसून, त्यांची ठेवण आणि रचनाही तेवढीच आकर्षक असावी. बहुतेक महिला केसांची रचना आकर्षक व स्टायलिश करुन आपले व्यक्तिमत्त्व खुलवत असतात. मात्र, बऱ्याचजणी केसांकडे फारसं लक्ष देत नाही.
-Ravindra Moreमहिलांच्या सौंदर्यात भर घालणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस होय. केस सुंदर असणे महत्त्वाचे नसून, त्यांची ठेवण आणि रचनाही तेवढीच आकर्षक असावी. बहुतेक महिला केसांची रचना आकर्षक व स्टायलिश करुन आपले व्यक्तिमत्त्व खुलवत असतात. मात्र, बऱ्याचजणी केसांकडे फारसं लक्ष देत नाही. त्यामुळे त्या सुंदर असून साजेशा केशरचनेअभावी त्यांचे सौंदर्य खुलून दिसत नाही. फार तर एखादा वेगळा कट करून स्वत:चा लूक बदलला जातो, मात्र आपली केशरचनाच आपले सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वात भर घालते. आजच्या सदरात आकर्षक केशरचनेविषयी जाणून घेऊया... भारतीय संस्कृतीत कोणत्याही सणासुदीत महिला विशेषत: साडी मोठ्या प्रमाणात परिधान करतात. त्याशिवाय हेवी वर्कचे ड्रेसेस, वनपीस व लेहंगा यांचादेखील वापर वाढला आहे. या कपड्यावर जर्दोसी, कुंदन वर्क, रेशमी धागे, बुट्टे, सिक्वेन्स अशी सुंदर कलाकृती सजविली जाते. या कपड्यांवर अत्यंत हलक्या, सोप्या पण तरी उठावदार केशरचना आवश्यक असतात. तसेच साडी जर परिधान केली असेल तर त्यावर आपल्या पद्धतीचा अंबाडा खूप छान दिसतो. तसेच त्या अंबाड्याला गोल गजरा लावला तर सौंदर्यात आणखीनच भर पडेल. अंबाडयाला आपण विविध पद्धतीने सजवू शकतो. त्यात पुढच्या केसांचा थोडा विस्कटलेला असा लूक करून मागे अंबाडा घालून त्यातून खालच्या केसांची साधी किंवा अनेक पेडींची वेणी घातली तर सुंदर दिसते. त्याशिवाय, पुढच्या केसांच्या मधे भांग पाडून किंवा कडेला भांग पाडून मागून एकदम चापूनचोपून अंबाडा घालणे, ही सुद्धा एलिगंट केशरचना वाटते. आपण जर दिवसभर एखाद्या कार्यक्रमात बिझी असाल तर अशी केशरचना आवश्यक करा, कारण दिवसभर अशा केशरचना उत्तम टिकू शकतात. आपला चेहरा गोल व अंडाकृती असेल तर बन खूप आकर्षक शोभून दिसतो. तसेच लांब केस असतील, तर ते थोडे कुरळे करून मोकळे सोडता येतील. खालच्या बाजूनेच केवळ कुरळे करून वरील केसांच्या दोन बटा मागे घेऊन पीन लावल्यास, सुटसुटीत व नीट अशी केशरचना होते. यातही मधून किंवा एका बाजूने भांग पाडून आपल्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात भर टाकू शकता. आपल्या लूकला अजून सुंदर करण्यासाठी एखादी वेणीही घालू शकता, त्यात पाचपेडी वेणी किंवा अनेक पेडींचीही वेणी घालता येते. तसेच कंटेंपररी लूकसाठी केसांना थोडे कुरळे करून सर्व केस एका बाजूला घेऊन त्यांची वेणी घालता येते. यात पुढच्या केसांच्या बटा मोकळ्या सोडाव्यात व पेडीही वरून सुरू न करता खांद्यापासून घालाव्या व शेवटपर्यंत घ्याव्यात. पंजाबी ड्रेस किंवा वनपीसवर आपले सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सर्व केस एका बाजूला घेऊन खांद्यावरून पुढे घ्यावेत व ते तसेच राहण्यासाठी हलकासा स्प्रे करु शकता. लहान केसांच्याही आकर्षक केशरचना करु शकता. त्यात वेगवेगळे हेअरबँड, मॅजिक बँड सारख्या वस्तू वापरून फॅशनेबल लूक प्राप्त करु शकता. केशरचना करण्यापूर्वी विशेष काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. केशरचना करण्यापूर्वी केस स्वच्छ धुतलेले असणे गरजेचे आहे. केसाला तेलकटपणा असेल तर चांगली केशरचना होणार नाही. केसांना रंग दिलेला आवडत असेल, तर एखाद्या वेगळ्या रंगातील बट रचनेत गुंफल्यानंतर हटके लूक देऊ शकते. सध्या मुलींना नीटनेटक्या केशरचनेऐवजी मेसी लूकच हवाहवासा वाटतो. त्यामुळे केस मोकळे सोडणे किंवा मेसी बनसारख्या केशरचना उत्तम पर्याय ठरतात. तसेच उंची व केसांची लांबी, पोत तसेच पोषाख पाहूनच केशरचना करावी.