३० वर्षापर्यंत असतात धूम्रपानाच्या खुणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 9:55 AM
धूम्रपान सोडूनही मानवी पेशीवर धुम्रपानाच्या खुणा या ३० वर्षापर्यंत टिकून राहत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे
धूम्रपान हे आरोग्यासाठी घातकच आहे. तरीही अनेकांची धूम्रपान सोडण्याची सवय काही सुटत नाही. जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काहीजण धूम्रपान सोडतात. त्यामुळे त्यांना आपण निरोगी झाल्याचे वाटत असेल. मात्र, धूम्रपान सोडूनही मानवी पेशीवर धुम्रपानाच्या खुणा या ३० वर्षापर्यंत टिकून राहत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. धूम्रपानामुळे कॅन्सरसह अन्य रोगही होण्याचा धोका मोठा असतो. धूम्रपान करणे थांबविल्यानंतही त्याचा परिणाम त्या व्यक्तिच्या डीएनए चाचणीत दिसून येत असल्याचे अमेरिकेतील नॅशनल इस्टिट्युट आॅफ हेल्थ सायन्सचे स्टेफनी जे. लंडन यांनी सांगितले.दहा वर्ष धूम्रपान करुन एखाद्या व्यक्तिने ते थांबविले तरीही कॅन्सर होण्याचा धोका कायम असल्याचा या संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी १६ हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन हा अभ्यास केला. धूम्रपान करणारे, न करणारे व ज्यांनी धूम्रपान थांबविले अशा जणांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. डीएनए मिथिलिकरण प्रक्रियेत नसांचे पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण असते. त्यामुळेच संबंधित व्यक्तीने केलेल्या धूम्रपानाची सहज माहिती उपलब्ध होते.