सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए सोबतच अनेक मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. सोयाबीनचा आहारात समावेश केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो तर येतोच. सोबतच सोयाबीन मास्क लावल्याने तुमच्या चेहऱ्याशी निगडीत समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ सोयाबीन मास्क तयार करण्याची पद्धत...
कसा बनवाल सोयाबीन मास्क?
- सोयाबीन मास्क तयार करण्यासाठी अर्धी वाटी सोयाबीन रात्री पाण्यात भिजवून ठेवा.
- सकाळी सोयाबीन पाण्यातून वेगळे काढा.
- हे सोयाबीन बारीक करा आणि एका वाटीमध्ये काढा.
- या सोयाबीन पेस्टमध्ये थोडी मलाई आणि अर्धा चमचा हळद घाला.
- आता यात एक चमचा मध घाला.
- सर्व गोष्टी चांगल्या एकत्र करा.
कसा कराल वापर?
सर्वातआधी चेहरा केवळ पाण्याने किंवा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर आणि मानेवर सोयाबीन मास्क लावा. हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल.
सोयाबीन फेस मास्कचे फायदे
सोयाबीन फेस मास्क चेहरा आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यातील तत्व त्वचेतील पीएच लेव्हल ठिक करतात. याने चेहऱ्याची मालिश केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीनही दूर होते. याचा सतत वापर केल्यास रंग उजळतो आणि त्वचा चमकदार होते.
सोयाबीन असतं व्हिटॅमिन इ
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात आढळतं. याने डेड स्कीन दूर होऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते आणि ग्लो येतो.
ऑयली स्कीनसाठी फायदेशीर
ऑयली स्कीन असणाऱ्यांसाठी सोयाबीन मास्क फार फायदेशीर आहे. कारण त्वचेतील अॅक्सेस ऑईल बाहेर काढतं. जर तुमची त्वचा निर्जीव झाली असेल तर सोयाबीनचा वापर करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. सोयाबीनचा वापर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी केला जाऊ शकतो.
सुरकुत्या दूर करण्यासाठी
सोयाबीनपासून तयार करण्यात आलेला हा फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही सहजपणे दूर करतो. याने तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. तुमचं वाढतं वय दिसणार नाही. तसेच याने त्वचेवरील डागही दूर होतात.