लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. अशातच सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजे,सन टॅनिंगची. उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी महिला आणि मुली अनेक उपाय करत असतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? महिलांपेक्षा पुरूषांना सन टॅनिंगचा सामान करावा लागतो. टॅनिंगची समस्या तुमचा लूक खराब करण्यासाठी कारणीभूत ठरते. तुम्हीही सन टॅनिंगमुळे त्रस्त असाल तर आज आम्हीतुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने पुरूष टॅनिंगच्या समस्येपासून सुटका करून घेऊ शकतात. जाणून घेऊया उपायांबाबत...
- अनेकदा सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे चेहऱ्याची त्वचा टॅन होते. त्वचेचा मूळ रंग नाहीसा होऊन ती काळवंडते. त्यासाठी अनेकदा पार्लर ट्रिमेंट किंवा अॅन्टी टॅन ट्रिटमेंट्सचा वापर करण्यात येतो. पण पार्लर ट्रिटमेंट करताना किंवा अॅन्टी टॅन ट्रिटमेंट करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. त्वचेचा मूळ टोन ओळखून त्यानंतरच कोणतीही ट्रिटमेंट करावी.
- उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर करून त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसण्यासाठी चेहऱ्यावरील मृत पेशी हटविणं अत्यंत आवश्यक असतं. टॅनिंग हटवण्यासाठी चेहऱ्यावर स्क्रब करणं अत्यंत आवश्यक आहे. पुरूषांनी स्क्रब करताना आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रब, फेस पॅक किंवा फेस वॉशचा वापर करावा. परंतु काळजी घ्या की, चेहऱ्याला जास्त मसाज करू नका.
- कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. सन टॅनिंगमुळे काळवंडलेल्या त्वचेवर कोरफडीचा गर लावून काही वेळासाठी तसचं ठेवा. अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होइल.
- टॅन झालेल्या स्किनवर टॉमेटोचा रस लावा आणि 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवून हात कोरडे करा. दररोज असं केल्याने टॅनिंगची समस्या काही दिवसांनी दूर होण्यास मदत होइल.
- लिंबामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर लिंबाचा रस परिणामकारक ठरतो. त्यासाठी एका लिंबाचा रस काळवंडलेल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचा ड्राय होणार नाही तसेच काळपटपणा दूर होण्यासही मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने फायदा होतो.