सुंदर दिसण्यासाठी अनेकदा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु अनेकदा त्यामुळे होणाऱ्या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा नियमित वापर केल्यामुळे आपलं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. अशातच आज अशा होममेड ब्युटी प्रोडक्ट्सबाबत सांगणार आहोत जे तुमचं नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतील. जाणून घेऊया घरच्या घरी केमिकल नसलेले ब्युटी प्रोडक्ट्स तयार करण्याची पद्धत...
नॅचरल लिप ग्लॉस
बाजारातील महागडे लिप ग्लॉस वापरण्याऐवजी घरी तयार केलेला नॅचरल लिप ग्लॉज वापरणं फायदेशीर ठरतं. लिप ग्लॉस तयार करण्यासाठी सर्वात आधी स्ट्रॉबेरी व्यवस्थित स्मॅश करून घ्या. त्यामध्ये 3 टेबलस्पून खोबऱ्याचं तेल आणि 2 टेबलस्पून ग्लिसरीन मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण लिप बामच्या कंटेनरमध्ये ओतून ठेवा. हे नॅचरल लिप ग्लॉस ओठ सुंदर आणि मुलायम करण्यासोबतच त्यांचे सौंदर्य वाढविण्यासही मदत करेल.
होममेड फाउंडेशन
जर तुम्ही दररोज फाउंडेशनचा वापर करत असाल तर बाजारातून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी तयार करू शकता. होममेड फाउंडेशन तयार करण्यासाठी 1 टिस्पून जोजोबा ऑइल, 1 टीस्पून आरारोट पावडर आणि 1 टीस्पून दालचिनी पावडर मिक्स करा. व्यवस्थित एकत्र केल्यानंतर फाउंडेशन कंटेनरमध्ये ठेवा. हे केमिकल फ्री फाउंडेशन फेसला नॅचरल लूक देण्यासाठी फायदेशीर ठरतं.
घरच्या घरी तयार करा आयलायनर
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी तुम्ही घरीच काजळ किंवा आयलायनर तयार करू शकता. त्यासाठी काही बदाम घेऊन ते कोळशाप्रमाणे काळे होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर हे बदाम व्यवस्थित बारिक करून घ्या आणि त्यामध्ये थोडसं बदामाचं तेल मिक्स करून एक घट्ट पेस्ट तयार करा. हे तुम्ही आयलायनर म्हणून वापरू शकता.
ब्लशर
ब्लशर गालांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु बाजारातून विकत आणण्याऐवजी तुम्ही घरीच ब्लशर तयार करू शकता. यासाठी सर्वात आधी 1/2 टीस्पून अरारोट पावडर घ्या. गुलाबी रंगासाठी त्यामध्ये 1/2 टीस्पून जास्वंदाच्या फूलाची पावडर एकत्र करा. त्यानंतर ते एका एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि त्याचा वापर करा.