स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड मोठया प्रमाणावर आढळून येतं जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि डाएटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून स्ट्रॉबेरी गुणकारी ठरते. जाणून घेऊया स्ट्रॉबेरीपासून तयार करण्यात येणाऱ्या काही फेसमास्कबाबत...
स्ट्रॉबेरी फ्रेश क्रिम मास्क
हा मास्क तयार करण्यासाठी सर्वात आधी स्ट्रॉबेरीची प्युरी तयार करून घ्या. या प्युरीमध्ये फ्रेश क्रिम किंवा दही एकत्र करू शकता. याचसोबत एक चमचा मधही एकत्र करू शकता. तयार मास्क 10 मिनिटासाठी चेहऱ्यावर लावून तसचं ठेवा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. हा मास्क चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी मदत होते.
स्ट्रॉबेरी फेस मास्क
स्ट्रॉबेरी फेस मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 स्ट्रॉबेरीची प्युरी तयार करा. आता ही प्युरी 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. 15 मिनिटांनी मास्क सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा. हा मास्क वापरल्यानंतर चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मास्क
स्ट्रॉबेरी क्रश करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये मध आणि कोको पावडर एकत्र करा. ही पेस्ट 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून तशीच ठेवा. हा मास्क नैसर्गिक पद्धतीने मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतो. मधामध्ये असलेले अॅन्टीबॅक्टेरिअस गुण त्वचा मुलायम करण्यासाठी मदत करतात.
स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा मास्क
त्वचा उजळवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा रस एकत्र करून तयार केलेला हा मास्क त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हा मास्क त्वचेवरील टॅन दूर करून रंग उजळवण्याचं काम करतो. हा मास्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी पेस्टमध्ये लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट चहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.