सुंदर असणे आणि सुंदरता कायम ठेवणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फार सुंदर नसलेले लोकही जेव्हा चेहऱ्याची खास काळजी घेतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. तेच फार सुंदर लोक जर चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणार नसतील तर वेळेआधीच ते वृद्ध दिसू शकतात. पर्सनॅलिटीचं सर्वात मोठं आकर्षण असतं चेहरा. त्यामुळे चेहरा धुतांना फार काळजी घ्यावी लागते. अनेकजण चेहरा धुतांना वेगवेगळ्या चुका करतात आणि मग त्यांचा चेहरा त्यांना हवा तसा दिसत नाही. त्यामुळे चेहरा धुतांना खालील चुका करु नये....
गरम पाणी
काही महिला किंवा पुरुष हे चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात जे त्वचेसाठी चांगलं नसतं. गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा लवकर खराब होते. गरम पाणी त्वचेला रखरखीत करतं. इतकेच नाही तर त्वचेवर सुरकुत्याही पडू लागतात. त्यामुळे चेहरा नेहमी कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवा.
साबणाचा वापर
कोणत्याही साबणाने चेहरा धुणे खरंतर चुकीचे आहे. साबणाने त्वचा फार कोरडी आणि रखरखीत होते. सोबतच त्वचा निर्जिव वाटायला लागते. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशचा वापर केल्यास फायदा अधिक होईल.
चेहरा न धुता झोपणे
ही सुद्धा एक फार मोठी चुकी अनेकजण करताना दिसतात. अनेकजण झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाहीत. दिवसभर चेहऱ्यावर धुळ, घाण साचलेली असते आणि यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि या कारणाने त्वचा कोरडी होते. ही सर्व वेळेआधी वृद्ध दिसण्याची लक्षणे आहेत.
मसाजची चुकीची पध्दत
चेहऱ्याची मसाज वरुन खाली करणे चुकीचे मानले जाते. मग ते चेहरा धुतांना असो वा स्क्रब करताना किंवा क्रिम लावताना. मालिश करताना बोटे नेहमी वरच्या दिशेने फिरवायला हवीत. मसाज खालच्या दिशेने केल्यास त्वचा सैल होऊ लागते.
स्क्रबिंग न करणे
आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. स्क्रबिंग केवळ महिलांच्याच त्वचेसाठी गरजेचे नाही तर प्रत्येक त्वचेसाठी गरजेचं आहे. पुरुषांनी स्क्रब केल्यास दाढीही चांगली येते आणि मृत सेल्स चेहऱ्यावरुन निघून जातात. तसेच याने चेहऱ्याचा रंग उजळतो.
चेहरा 'असा' पुसणे
चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने जोरजोरात घासून पुसणे हेही चुकीचे आहे. असे करणे म्हणजे तुम्ही सगळा राग चेहऱ्यावर काढताय की काय असं वाटतं. पण याने त्वचा खराब होते. जोर लावून चेहरा पुसण्याएवजी हळूहळू चेहरा कोरडा करा. त्वचा आधीच नाजूक असते त्यात तुम्ही जोर लावल्यावर अधिक नुकसान होतं.