सुंदर लांबसडक केस सगळ्यांनाच हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. नारळाचं तेलं, बदामाचं तेलं, राईचं तेलं अशा वेगवेगळ्या तेलांचा वापर केसांवर करून स्त्रिया केसांची काळजी घेतात. तसंच काहीवेळा तेल कोमट करून त्यात काही वनस्पती घालून सुध्दा महिला आपल्या केसांना लावत असतात. पण हे लावत असताना काही चुका केल्यास महागात पडू शकतं. केसांना तेल लावत असताना जर काही चुका केल्या तर तेल लावून काही उपयोग होत नाही.
बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे तसंच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. तसंच कोंडा झाल्यामुळे खाज येते. कारण केसांना तेल लावताना जर तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला समस्या जाणवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चुका केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.
एकाचवेळी जास्त तेल लावणे
सध्याच्या काळात महिला कामामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बसून केसांना तेल लावणं, केसांची मालीश करणं शक्य होत नाही. म्हणून काही महिला आठवड्यातून एक दिवस जेव्हा वेळ मिळत असतो तेव्हा जास्त तेल लावतात. असं केल्यास केस शॅम्पूने धुताना तेल व्यवस्थित निघत नाही. तसंच शॅम्पूचा जास्त वापर केल्याने केसांचा चमकदारपणा निघून जातो आणि केस कोरडे दिसू लागतात.
केस घट्ट बांधणे
केसांना तेल लावल्यानंतर केसांची मुळं नाजूक आणि सैल झालेली असतात जर अशा वेळी केसांना तुम्ही घट्ट बांधून ठेवले तर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना घट्ट बांधण्याऐवजी जर तुम्ही केसांची वेणी घातली किंवा केस मोकळे सोडले तर फायदेशीर ठरेल.
तेल लावल्यानंतर केस जास्त वेळ तसेच ठेवणे
अनेक महिलांचा असा समज आहेत की तेल लावल्यानंतर बराच वेळ किंवा अनेक दिवस केस तसेच राहू दिले तर पोषण मिळतं पण असं नसून जर केसांना तेल लावल्यानंतर काही तासांच्या आत धुतले नाही तर केंसावर आणि केसांच्या मुळांवर धुळीचे कण बसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे केस खराब व्हायला वेळ लागणर नाही. त्यामुळे तेल लावल्यानंतर २ ते ३ तासांनी केस धुवून टाका.
तेल लावल्यानंतर कंगवा फिरवणे
(image credit- beautycentralmelta.com)
जर तुम्ही तेल लावल्यानंतर लगेच कंगवा फिरवत असाल तर केसांच्या मुळांना त्रास होऊन केस गळू शकतात. कारण तेल लावल्यानंतर केसांची मुळं नाजूक झालेली असतात. कंगवा फिरवल्यानंतर केस तुटण्याची शक्यता असते.