श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यापासूनच सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण म्हणजे सणांचा महिना असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा यांसारखे अनेक सण येतात. यानिमित्ताने घराघरांत या संणांसाठी तयारी करण्यात येते. श्रावण महिना महिलांसाठी फार महत्त्वपूर्ण असतो. या महिन्यात महिला विशेष शृंगार करतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मेहंदी. हातावर मेहंदीची नक्षी काढणं म्हणजे सर्व स्त्रियांना आवडणारा विषय. आपल्या मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. पण अनेकदा या प्रयत्नांना यश येत नाही. पण काही घरगुती उपायांनी तुम्ही हातावरच्या मेहंदीचा रंग खुलवू शकता. जाणून घेऊयात हातावरील मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही घरगुती उपाय...
मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा...
- मेहंदी काढण्याआधी हाथ स्वच्छ धुवून घ्या. हात जर घाण असतील तर, मेहंदीचा रंग खुलणार नाही.
- मेहंदी लावण्याआधी तुमचे हात जास्त थंड असतील तरीदेखील त्याचा परिणाम मेहंदीच्या रंगावर होईल. कारण मेहंदीचा रंग खुलणं हे आपल्या हाताच्या तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे हातांचा तापमान नार्मल असणं गरजेचं आहे.
- मेहंदी लावण्याआधीच हातांना वॅक्सिंग किंवा स्क्रब करून घ्या. कारण मेहंदी लावल्यानंतर जर वॅक्सिंग आणि स्क्रब केलं तर मेहंदीचा रंग निघून जातो.
- मेहंदी लावल्यानंतर सूर्याची किरणं थेट हातांवर पडणार नाहीत याची काळजी घ्या. कारण सूर्याची किरणं थेट हातावर पडल्यामुळे मेहंदीचा रंग फिका पडतो.
- मेहंदी सुकल्यानंतर काढून टाकताना थेट पाण्यामध्ये हाथ धूवू नका. जर मेहंदी पूर्णपणे सुकलेली असेल, तर चमच्याच्या मदतीने किंवा चाकूने काढा. पाण्यात हात धुतल्याने मेहंदीचा रंग फिका होऊ शकतो.
मेहंदींचा रंग खुलवण्यासाठी हे उपाय करा...
साखर आणि लिंबाचं पाणी
मेहंदी लावल्यानंतर काही वेळाने सुकू लागते. त्यावेळी एका वाटीमध्ये लिंबू आणि साखर सारख्याच प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीने मेहंदीवर लावा. त्यामुळे मेहंदीचा रंग खुलण्यास मदत होते.
मोहरीचं तेल
मेहंदी पूर्णपणे सुकल्यानंतर त्यावर मोहरीचं तेल लावा. त्यानंतर ते अर्धा तास तसचं ठेवा. त्यानंतर मेहंदी काढून टाका. मेहंदीचा रंग खुलून दिसेल.
विक्स वेपोरब
मेहंदी काढून टाकल्यानंतर हातांना विक्स वेपोरब किंवा आयोडेक्स लावा. हा उपायही मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी मदत करेल .
लवंग
मेहंदी सुकल्यानंतर त्यावर लवंगाचं तेल लावा. तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. त्यावर 5 ते 6 लवंग टाका. जेव्हा लवंगमधून धूर येण्यास सुरू होईल त्यावेळी त्यावर हात शेका. त्यामुळे मेहंदीचा रंग खुलण्यास मदत होईल.