वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नव्हे तर त्वचेच्या आणि केसांच्याही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. अनेकदा जीन्स आणि हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळेही केस पांढरे होतात. जर तुम्हालाही कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होण्यासोबतच केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही मदत होईल. जाणून घेऊया उपायांबाबत...
का होतात पांढरे केस?
आपल्या केसांना येणारा काळा रंग केसांच्या फोलिकल्समध्ये आढळून येणाऱ्या मेलानिन पिंगमेंट या तत्वामुळे असतो. जेव्हा हे पिगमेंट तयार होणं बंद होतं किंवा हे तयार होण्याचे प्रमाण कमी होतं, त्यावेळी केस पांढरे होण्यास सुरुवात होते.
केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यासाठी काही उपाय :
1. मेहंदी
मेहंदीचा वापर केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी करण्यात येतो. केसांना कलर करण्यासाठी केमिकलयुक्त कलर वापरण्याऐवजी मेंहंदी लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासोबतच केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही उपयोग होतो. त्याचबरोबर केस मुलायम आणि चमकदार होतात. केसांना मेहंदी लावण्यासाठी एका भांड्यामध्ये रात्रभर मेहंदी भिजत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये कॉफी आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांवर लावा.
2. चहा पावडर
चहा पावडरमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे केसांचा रंग डार्क करण्यासोबतच पांढऱ्या केसांची वाढ थांबवण्यासाठीही उपयोगी ठरतं. चहा पावडरच्या मदतीने केसांना कलर करण्यासाठी चहा पावडर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून थंड करून घ्या. तयार पाणी केसांच्या मुळापाशी लावून मसाज करा. साधारणतः तासाभराने पाण्याने केस धुवून टाका. पण लक्षात ठेवा, केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करू नका.
3. तीळ आणि बदामाचे तेल
बदामाच्या तेलामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स आढळून येतात. हे केसांच्या वाढिसोबतच केस गळण्यापासून रोखण्यासही मदत करतात. त्यासोबतच डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करण्यासाठीही हे तेल फायदेशीर ठरतं. बदामाच्या तेलामुळे केस काळे होण्यासाठी मदत होते. तर तीळाचे तेलही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा यापैकी एका तेलाने केसांना मालिश केल्याने केस हेल्दी होण्यास मदत होते.
4. आवळा
केसांचे आरोग्या राखण्यासाठी अनेक लोक आवळ्याचा वापर करतात. आयुर्वेदातही आवळ्याचे सौंदर्यासाठी असे अनेक फायदे सांगितले आहेत. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे केस पांढरे होण्यापासून रोखण्याचं काम करतात. केसांना हेल्दी आणि काळे ठेवण्यासाठी अनेक प्रकारे आवळ्याचा उपयोग करण्यात येतो.
5. मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स आढळून येतात. जे केस पांढरे होण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवून बारिक वाटून घ्या. त्यानतर तयार पेस्ट खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा बदामाच्या तेलामध्ये एकत्र करून केसांच्या मुळांना मसाज करा.