Aloe Vera for hair : अॅलोवेरा म्हणजे कोरफडीचा वापर त्वचेसाठी आणि केसांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कोरफडीच्या पानांचा ताजा गर काढूनही वापरला जाऊ शकतो. तसेच बाजारात कोरफडीचं जेलही मिळतं. कोरफडमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन्स आणि खनिजही असतात. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांची वाढही वेगाने होते. इतकंच नाही तर केसगळती थांबून केस चमकदार होतात. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एक आठवडा कोरफड कशा पद्धतीने लावल्यावर केसांवर कसा प्रभाव पडतो.
केसांवर कोरफड लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
कोरफडीचा ताजा गर
कोरफड केसांवर लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कोरफडीचा गर किंवा जेल थेट केसांवर लावणे. कोरफडीचा गर एका वाटीमध्ये काढा आणि चमच्याच्या मदतीने तो आधी बारीक करा. हा गर केसांच्या मुळांना लावा आणि २० ते २५ मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. याने केस मुलायम आणि चमकदार दिसतील.
कोरफड स्प्रे
केसांवर जर कोरफडीचा मास्क लावायचा नसेल तर तुम्ही कोरफडीचा स्प्रे तयार करूनही लावू शकता. हा स्प्रे तयार करण्यासाठी पाण्यात कोरफडीचा ताजा गर टाकून मिक्स करा. नंतर हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. केसांवर स्प्रे केल्यानंतर काही तासांसाठी ते तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या.
कोरफड आणि कंडीशनर
कंडीशनरमध्ये कोरफडीचा गर टाकून केसांना लावू शकता. जर तुम्ही लिव इन कंडीशनरचा वापर करत असाल तर त्यात कोरफडीचा गर मिक्स करा. हे मिश्रण केसांवर चांगल्याप्रकारे लावा. काही वेळानंतर केस पाण्याने धुवून घ्या. या उपायाने केस चमकदार आणि मुलायम होतील. तसेच केस मजबूतही होतील.
कोरफडीचा हेअर मास्क
लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी केसांवर कोरफडीचा हेअर मास्क तयार करून लावू शकता. हा हेअर मास्क तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकता. तुम्ही कोरफड आणि मध एकत्र करून हेअर मास्क तयार करू शकता. तसेच कोरफडमध्ये कॉफी टाकूनही हेअर मास्क बनवता येतो. कोरफडीच्या गरात अॅपल सायडर व्हिनेगर, खोबऱ्याचं तेल टाकूनही हेअर मास्क बनवता येतो. या हेअर मास्कने केसांना पोषण मिळेल आणि केसगळतीही थांबेल.