Home Remedies For White Hair: वाढत्या वयात केस पांढरे होणं ही एक सामान्य बाब आहे. पण आजकाल बऱ्याच लोकांचे कमी वयातच केस पांढरे होतात. अशात लोक केस काळे करण्यासाठी मेहंदी, हेअर डाय आणि हेअर कलरचा वापर अधिक करतात. पण यांमधील काही नुकसानकारक केमिकल्सही असतात. ज्यामुळे केसांचं अधिक नुकसान होतं. अशात आपले केस काळे करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायांची मदत घेऊ शकता.
या उपायांमध्ये मोहरीच्या तेलाचा समावेश आहे. मोहरीचं तेल केस मजबूत करण्यासोबतच केस काळे करण्यासही मदत करतं. जर तुम्ही यात एक खास गोष्ट मिक्स केली तर याने केस काळे होण्यास मदत मिळू शकते. अशात जाणून घेऊ मोहरीच्या तेलाने केस काळे करण्याचा सोपा उपाय...
मोहरीचं तेल आणि कलौंजी
तुमचे पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये कलौंजी मिक्स करू शकता. कलौंजीला मराठीत काळे जिरे किंवा कांद्याच्या बीया असंही म्हणतात. मोहरीच्या तेलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांना निरोगी ठेवतात आणि पांढरे होण्यापासून वाचवतात. या तेलाच्या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केस काळे होण्यास मदत मिळते.
कलौंजीमध्ये फॅटी-अॅसिड, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे केसगळती, कोंडा आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच याने केसांची वाढही चांगली होते.
कसं कराल तयार?
४ ते ५ मोठे चमचे मोहरीचं तेल घ्या आणि २ चमचे कलौंजी घ्या. सगळ्यात आधी लोखंडाच्या कढईमध्ये मोहरीचं तेल गरम करा. जेव्हा तेल गरम होईल तेव्हा त्यात कलौंजीच्या बीया टाका आणि साधारण १० मिनिटे उकडू द्या. तेलाचा रंग डार्क होईपर्यंत ते गरम करा. त्यानंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. हे तेल तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करू शकता.
कसा कराल वापर?
यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी केस चांगले विंचरून घ्या. नंतर हे तेल केस आणि डोक्याच्या त्वचेवर लावा. साधारण १० मिनिटे केसांची हलक्या हाताने मालिश करा. हे तेल केसांवर साधारण २ तास किंवा रात्रभर तसंच ठेवा. नंतर तुम्ही वापरता त्या शाम्पूने केस धुवून घ्यावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाचा असाच वापर करावा. केस काळे, मजबूत होतील आणि केसांची वाढही होईल.