देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर भात खाणारे लोक आढळतातच. भात जवळपास देशातील प्रत्येक घरात तयार होतो. देशाच्या अनेक भागांमध्ये तांदळाची मोठी शेतीही केली जाते. चांगल्या आरोग्यासाठीही तांदूळाचे अनेक फायदे सांगितले जातात. त्यासोबत चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठीही तांदूळ फायदेशीर आहे. तांदूळाचं पाणी जे तांदूळ शिजवल्यावर काही लोक फेकून देतात. या पाण्याने चेहऱ्याची सुंदरता वाढवता येते.
तांदळाचं पाणी फायदेशीर कसं?
तांदूळ शिजवण्यासाठी ते पाण्यात टाकले जातात. ते पाणी उकळल्यानंतर तांदुळातील पोषक तत्व पाण्यात येतात. जसजसे तांदूळ शिजत जातात पाण्याचाही रंग बदलतो आणि ते पाणी घट्टही होतं. या पाण्यात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स एकत्र होतात. याचा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यास मदत होते. चला जाणून घेऊ कसा करावा याचा वापर...
चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी
तांदूळ शिजल्यानंतर त्यातील पाणी चाळणीच्या मदतीने एका भांड्यात काढा. हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर कॉटनच्या मदतीने हे पाणी चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. चेहरा सुकल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा धुवा.
काय होतो फायदा?
हे पाणी त्वचेवर लावल्याने त्वचा टाईट होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
या उपायामुळे त्वचा आणखी मुलायम होते.
तसेच या पाण्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, डाग येत नाहीत.
मुलायम केसांसाठी
जर तुम्हाला सुंदर, लांब आणि मुलायम केस हवे असतील तर तांदळाचं हे पाणी तुमच्या फायद्याचं ठरु शकतं. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम होतात. तुम्हाला हवं असेल तर या पाण्यात लॅवेंडर तेलही मिश्रीत करु शकता. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यावर साध्या पाण्याने पुन्हा एकदा केस धुवा.
काय होतो फायदा?
या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम होतात. तसेच डोक्याच्या त्वचेला पोषक तत्वेही मिळतात.
या पाण्याने केस धुतल्यास व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या मदतीने केस आणखी मजबूत आणि सुंदर होतात.