सध्या फॅशनवर्ल्डमध्ये अनेक नवनवीन फॅशन ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. सध्या मोठे आणि लांब इयररिंग्सचा ट्रेंड आहे. अनेक महिला आणि तरूणी वेगवेगळ्या स्टाइल्सचे आणि पॅटर्नचे इयररिंग्स वापरतात. हे इयररिंग्स जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी त्यावर काचा किंवा इतर साहित्याने त्यावर सजावट करण्यात येते. तसेच त्यासाठी अनेक धातूंचाही वापर करण्यात येतो. असे हेवी इयररिंग्स कानात घातल्याने कानाची छिद्र मोठी होतात. त्याचबरोबर अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. फक्त काही धातूच कानासाठी सुरक्षित समजले जातात.
या समस्या होण्याचा असतो धोका
बाजारामध्ये अनेक असे इयररिंग्स उपलब्ध आहेत की, जे दिसण्यासाठी फार आकर्षक आहेत. पण त्यामुळे त्वचेचं इन्फेक्शन, खाज येणं आणि कानांची छिद्र मोठी होणं यांसारख्या समस्या उद्भवतात.
सध्या इयररिंग्स आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये मोती, काचा इत्यादी गोष्टी लावण्यात येतात. त्यामुळे कानातले वजनदार होतात आणि कानांवर त्याचं वजन पडतं. परिणामी कानांची छिद्र मोठी होतात.
निकेल, पितळ यांसारख्या धातूंचा इयररिंग्स तयार करण्यासाठी वापर करण्यात येतो. परंतु या धातूंपासून तयार केलेले इयररिंग्स कानामध्ये घालणं हे फार घातक ठरतं. त्यामुळे त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
कानाची त्वचेसाठी सुरक्षित आहेत हे धातू :
सोनं -
सोन्यापासून तयार करण्यात आलेले इयररिंग्स त्वचेसाठी पूर्णतः सुरक्षित असतात. फक्त एवढचं लक्षात ठेवा की, सोनं 24 कॅरेट किंवा त्यापेक्षा अधिक शुद्धतेचं असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे व्हाइट गोल्ड कानामध्ये घालणंही फार फायदेशीर ठरतं. व्हाइट गोल्ड रोडिअम, पॅलेडिअम आणि मॅगनिजपासून तयार करण्यात येतं. यामध्ये स्वस्त आणि कानांसाठी घातक असणाऱ्या धातूंचा समावेश होत नाही.
चांदीचे इयररिंग्स आणि झुमके -
चांगल्या क्वालिटीचे चांदीचे इयररिंग्स त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात. असं सुद्धा दिसून आलं आहे की, ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते. बराचवेळ चांदीचे इयररिंग्स घातल्याने त्यांना खाज येण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर चांदीचे इयररिंग्स फक्त काही वेळासाठी वापरा.
प्लॅटिनम –
प्लॅटिनम सर्व धातूंपैकी फार महाग समजला जातो. परंतु, त्याचबरोबर हा धातू इतर धातूंच्या तुलनेत सुरक्षित आणि टिकाऊ समजला जातो.
याचाही वापर करू शकता
- स्टेनलेस स्टीलचा हुक असलेले इयररिंग्स
- लाकडाचा हुक असणारे इयररिंग्स
- जर तुम्हाला धातू आवडत नसेल किंवा सूट होत नसेल तर तुम्ही प्लास्टिकचे इयररिंग्स ट्राय करू शकता.
संवेदनशील त्वचा असल्यास हे उपाय करा
तुम्ही तुमच्या इयररिंग्सच्या मागे असलेल्या हुकावर नेल पॉलिशचा एक लेयर किंवा थोडं व्हॅसलिन लावून मग वापरू शकता. यामुळे इयररिंग्सचं मेटल तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही आणि तुमची त्वचा सुरक्षित राहण्यास मदत होईल.