तुमच्यासोबत असं कधी झालयं का? तुम्ही पार्टीसाठी हेअरस्टाइल करण्याच्या विचारात आहात, पण कंगवा आणणंच विसरलात? अशावेळी आपल्यापैकी अनेकजण मैत्रीणीकडून कंगवा मागतात. ती मैत्रीण आपल्या बॅगेतून कंगवा काढते आणि तुम्हाला देते आणि तोच कंगवा घेऊन तुम्ही तुमचे केस विंचरता. परंतु ही सवय योग्य नाही. असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण माहीत नाही का? जाणून घ्या.
एकमेकांचा कंगवा वापरल्याने काय होतं?
एकमेकांचा कंगवा वापरल्याने सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे उवांचा. तसेच एकच कंगवा 2 ते 3 लोकांनी वापरल्याने डोक्याच्या त्वचेला फंगल इन्फेक्शन, खाज यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. फंगल इन्फेक्शनमुळे डोक्याच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या इन्फेक्शन झालेल्या मैत्रिणीचा कंगवा वापरत असाल तर तुम्हालाही इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे मैत्रिणींचा कंगवा किंवा पार्लरमधील कंगवा वापरणं टाळा. नाहीतर डोक्याच्या त्वचेच्या समस्या, केस तुटणं किंवा गळणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचा कंगवा तुमच्यासोबत ठेवा.
अशी करा कंगव्याची स्वच्छता
तुम्हाला तुमचा कंगवा नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण अस्वच्छ कंगव्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. कंगव्यामध्ये अनेकदा घाण, धूळ असते. बाहेर फिरताना धुळीमुळे किंवा घाणीमुळे केसांमध्ये गुंता होतो. कंगव्याच्या मदतीने केसांचा हा गुंता सोडवला जातो. म्हणून कंगवा आठवड्यातून एकदा स्वच्छ करणं आवश्यक असतं. प्रत्येक आठवड्यात निदान एक तास तरी कंगवा एखाद्या अॅन्टीबॅक्टेरियल साबणाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. त्यामुळे कंगव्यावरील घाण आणि धूल दूर होण्यासोबतच अडकलेले केस निघून जाण्यासही मदत होईल.
कंगवा नीट पाहून वापरत जा. कारण अनेकदा केस विंचरताना त्याचे दात तुटतात आणि हे तुटलेले दात केसांमध्ये अडकून केस तुटण्याची शक्यता असते. कधीकधी यामुळे डोक्याच्या त्वचेला जखमही होऊ शकते.