Coconut Oil On Face : त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या तेलांचा वापर करतात. यातीलच एक तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल हे आपल्या वेगवेगळ्या गुणांसाठी ओळखलं जातं. केवळ त्वचा आणि केसच नाही तर आरोग्यालाही या तेलाचे अनेक फायदे होतात.
खोबऱ्याच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिड असतं, फॅटी अॅसिड असतं आणि सोबतच अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही आढळतात. खोबऱ्याचं तेल हे हायड्रेटिंगही असतं. ज्यामुळे ड्राय स्कीन असलेले लोक हे चेहऱ्यावरही लावू शकतात. पण ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट असेल त्यांना त्वचेवर खोबऱ्याचं तेल न लावण्याचा सल्ला दिला जातो. अशात आज आम्ही तुम्हाला खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावण्याचे फायदे, नुकसान आणि चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावण्याची योग्य पद्धत
ज्या लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ असेल आणि सोबतच ज्यांची त्वचा जास्त तेलकट असेल त्यांनी चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावणं टाळलं पाहिजे. सामान्यपणे खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तेलकट त्वचा असलेल्यांनी असं करणं टाळलं पाहिजे. असं केल्याने चेहऱ्यावर पुरळ आणखी वाढते.
खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर सनस्क्रीनसारखं लावलं जातं. ही पद्धत योग्य नाही. खोबऱ्याचं तेल आणि सनस्क्रीन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांचे त्वचेला वेगवेगळे फायदेही होतात.
कुणी चेहऱ्यावर लावावं हे तेल?
ज्या लोकांची त्वचा जास्त ड्राय आहे अशा लोकांनी चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावावं. ज्या लोकांची त्वचे कोरडी दिसते आणि त्वचेवर पांढऱ्या रेषा दिसतात ते लोकही चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावू शकतात.
खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर लावण्यासाठी याचे २ ते ३ थेंब हातावर घ्या. हे तेल हातावर पसरवा. नंतर चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसंच ठेवा आणि नंतर पाण्याचे चेहरा धुवून घ्या. याचा प्रभाव वाढवण्यासाठी यात चिमुटभर हळद टाका.