त्वचेसंबंधी एक सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे खाज. वेगवेगळ्या कारणांनी अनेकांच्या त्वचेवर खाज येते. वेळीच यावर उपाय केले नाही तर खाज वाढून गंभीर रुप धारण करु शकते. यावर वेगवेगळे उपाय असले तरी त्याने फायदा होईलच असेही नाही. अशातच आता संशोधकांनी खाजेच्या उपचारासाठी एक खास उपाय शोधून काढला आहे. खाज झाल्यावर आता कोणतं क्रीम किंवा जेल लावण्याची गरज पडणार नाही. कारण संशोधकांनी असा दावा केला आहे की, खाज झालेल्या जागेवर एका खासप्रकारच्या लाइटचा प्रकाश पाडल्यास खाज लगेच दूर होईल.
उपचाराची ही नवी पद्धतीचा उंदरांवर यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. उंदरांवर करण्यात आलेल्या या प्रयोगात आढळले की, हा उपचार केल्यावर त्यांना झालेली खाजेची समस्या कमी झाली आणि उंदरांनी खाज झालेल्या भागाला कमी खाजवलं.
गंभीर त्वचा रोगांमध्ये खाजेपासून सुटका अस्थायी पद्धतीनेच मिळते. पण आता नव्या पद्धतीने उपचाराची पद्धत सोपी होईल. रोममधील युरोपियन आण्विक जैवविज्ञान प्रयोगशाळेच्या अभ्यासकांनी या नव्या उपचार पद्धतीत खाजेच्या वास्तविक कारणांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर ही नवी पद्धत समोर आली.
असा होणार उपचार
अभ्यासकांनी आईएल३१- आईआर७०० नावाचं एक केमिकल तयार केलं आहे. हे केमिकल प्रकाशाप्रति संवेदनशील आहे. आणि ज्या पेशींमुळे खाज होते, त्यांना त्वचेच्या तळाला बांधून ठेवते. अभ्यासकांची टीमने हे केमिकल उंदरांच्या त्वचेत इंजेक्ट केलं. त्यानंतर केमिकल लावलेल्या त्वचेवर इंफ्रारेड लाइटचा प्रकाश टाकला गेला तेव्हा खाजेसाठी कारणीभूत पेशी निष्प्रभावी झाल्या. या प्रोजेक्टचे सकारात्मक प्रभाव जनावरांवर बघायला मिळाले.