रोज व्यायाम न केल्यामुळे जगाचे होते ४.५ हजार कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 5:15 PM
५३.८ बिलियन डॉलर्स विविध आरोग्य समस्या उपचारांवर तर त्यामुळे घटलेल्या उत्पादकतेमुळे १३.७ बिलियन डॉर्सचा भुर्दंड सहन करावा लागला.
वाचून आश्चर्य वाटले ना? अहो पण ते खरं आहे. आईवडिल, डॉक्टर कितीही ओरडून सांगत असले तरी आपला सकाळी उठण्याचा कंटाळा काही जाणार नाही. पण असे करणे केवळ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असे नाही.संशोधकांच्या एका गटाने केलेल्या अध्ययनानुसार रोजच्या रोज व्यायाम न केल्यामुळे उद्भवणाºया आरोग्य समस्यांवर २०१३ साली संपूर्ण जगाचे ६७.५ बिलियन डॉलर्स (४५२२ कोटी रु.) खर्च झाले.यांपैकी ५३.८ बिलियन डॉलर्स विविध आरोग्य समस्या उपचारांवर तर त्यामुळे घटलेल्या उत्पादकतेमुळे जगाला १३.७ बिलियन डॉर्सचा भुर्दंड सहन करावा लागला, अशी माहिती ‘द लॅन्सेट’ नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित लेखात देण्यात आली आहे. ‘नॉर्वेयन स्कूल आॅफ स्पोर्टस् सायन्सेस’द्वारे १४२ देशांतून सुमारे ९३ टक्के जागतिक लोकसंख्येची माहिती गोळा करून तिच्या अभ्यासाअंती हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.संशोधनामध्ये केवळ - हृदयविकार, स्ट्रोक, टाईप २ मधुमेह, स्तन कॅन्सर आणि आतड्याचा कॅन्सर - या पाच प्रकारच्या आजारांचा सामावेश करण्यात आला होता. यावर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी ही मर्यादित अंदाजावर आधारित असून प्रत्यक्षात यापेक्षा किती जास्ता खर्च होत असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. पुरेशी शारीरिक हालचाल न करण्याच्या जीवनशैलीमुळे दरवर्षी जगात ५० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सल्ल्यानुसार आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.