वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. पण तुम्हाला माहीत आहे का?; आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे असतात. याच्या आजूबाजूची त्वचाही फार संवेदनशील असते. पण बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हीही असचं डोळे आणि त्याच्या आजूबाजूच्या त्वचेकडे दुर्लक्ष करत असाल तर काही गोष्टी जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला डोळे आणि आजूबाजूच्या त्वचेची काळजी घेण्यास मदत होईल.
नाजूक असतात डोळे...
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा फार सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा आपल्या शरीराच्या अवयवांच्या त्वचेपेक्षा अत्यंत नाजूक असते. याच त्वचेवर सर्वात आधी डार्क सर्कल्स, फाइन लाइन्स आणि आय बॅग तयार होतात. त्यामुळे कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं चेहऱ्यावर दिसू लागतात. जाणून घेऊया डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी त्याबाबत...
मेकअप करताना लक्षात घ्या काही गोष्टी
महिला असो किंवा पुरूष जेव्हा डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर कोणताही मेकअप अप्लाय करतात किंवा मेकअप काढत असतात, त्यावेळी सावध राहणं अत्यंत आवश्यक असतं. कारण डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अत्यंत सेंसिटिव्ह असते. त्यामुळे मेकअप काढताना किंवा करताना अलगद हातांनी करावा. तसेच मेकअप काढताना कापसाच्या मदतीने मेकअप काढावा.
उन्हापासून बचाव करा...
थंडी असो किंवा उन्हाळा, बाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रिन लावणं आवश्यक असतं. उन्हाच्या प्रखर आणि हानिकारक किरणांचा परिणाम सर्वात जास्त डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर होत असतो. याचं कारण म्हणजे, ही त्वचा अत्यंत नाजूक असते. जर जास्त ऊन असेल, तर सनस्क्रिन लावण्यासोबतच सनग्लासेसचाही वापर करा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण होतं.
झोप पूर्ण करा...
तुम्ही पाहिलं असेल की, ज्यादिवशी तुमची झोप पूर्ण होणार नाही किंवा तुम्ही उशीरापर्यंत जागे राहता, त्यावेळी डोळ्यांच्या आजूबाजूला हलकीशी सूज येते आणि डार्क सर्कल्स येतात. म्हणजेच अपूर्ण झोपेमुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला झोप पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असतं.
व्यसनांपासून दूर रहा...
ज्या व्यक्ती सिगरेट, बीडी किंवा इतर गोष्टींचे धुम्रपान करत असतात. त्यावेळी डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा काळी दिसू लागते आणि चेहऱ्यावर फाइन लाइन्स किंवा सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी धुम्रपान आणि मद्यसेवन करणं टाळावं लागेल.