केज येथील केज-कळंब रोड लगतच्या कामगार नगर येथे पोपट नवनाथ मुळे यांचे घर आहे. १० फेब्रुवारी, बुधवार रोजी सकाळी १० वाजता पोपट मुळे हे चिंचोली माळी येथील त्यांच्या दुकानात गेले होते. आणि त्यांची पत्नी ही घराला कुलूप लावून साबला येथे माहेरी गेली होती. दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान पोपट मुळे हे केज येथे घरी आले असता त्यांना घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले. तसेच कुलूप देखील तुटून पडले असल्याचे दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे ३.५ ग्रॅमचे गंठन, प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाचा एक बदाम व एक अर्ध्या ग्रॅम वजनाची बाळाची अंगठी. असे एकूण साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे चैन व वाळे असा एकूण १ लाख ३४ हजार रु. ऐवज चोरी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशानुसार रुक्मिणी पाचपिंडे व बाळासाहेब अहंकारे यांनी भेट दिली आहे. या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त
शहरात भरदिवसा घरफोडी झाल्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी वेळीच या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.