बीड : शेतकऱ्यांना एकाच संकेतस्थळावरून सर्व योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘महाडीबीटी’वर अर्ज मागवले होते. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून १ लाख ९४ हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र, राज्य शासनाकडून फक्त १३६५ जणांना लॉटरी पद्धतीने लाभ दिला आहे. याचे संदेश संबंधीत लाभार्थी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे पाठवण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना विहीत कालावधीत लाभ मिळावा यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी.मुळे यांनी तत्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत.
यांत्रिकीकरण, फळबाग, सिंचन या योजनांसाठी महाडीबीटीवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. याची सोडत लॉटरी पद्धतीने राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३६५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती लाभार्थ्यांना मोबाईल संदेशाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, योजनेचा लाभ घेणास इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज व मिळणारा लाभ यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. राज्य शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी दिला आहे.
योजनानिहाय अर्ज
यांत्रिकीकरण - ८००६१
सिंचन - ४५१७१
हॉर्टीकल्चर (फळबाग) -६४१४४
अनुसुचित जाती जमाती (जिल्हापरिषद) - ४६७४
एकूण १०९४५०
८ दिवसात कार्यवाही करणे
गरजेचे महाडीबीटी पोर्टवरील अर्जाच्या माध्यमातून ज्या १३६५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अशा निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश प्राप्त झालेले आहेत. या शेतकऱ्यांनी युजरनेम व पासवर्डद्वारे लॉगिन करुन केलेल्या अर्जानुसार वैयक्तिीक आवश्यक कागदपत्रे (१५ केबी ते ५०० केबी) या आकारमानातच महा-डीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत. ही कार्यवाही ८ दिवसाच्या आत पुर्ण करावी. त्यानुसार अर्जदारास महा-डीबीटी पोर्टलवर पुर्वसंमती पत्र दिले जाईल. त्यानंतरच योजनेचे साहित्य खरेदीची कार्यवाही मुदतीत करावी व त्या बाबतचे जीएसटी बील अपलोड करावेत. त्यानंतर अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यावर अनुदान डि.बी.टी.द्वारे राज्यस्तरावरून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास लॉटरीत निवड झालेल्या पुढील प्रतिक्षाधीन क्रमांकाच्या शेतकऱ्यांना पुर्वसंमती दिली जाईल व आपली लॅाटरीद्वारे झालेली निवड आपोआप रद्द होईल, त्यामुळे निवड झालेल्या शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येते की, आपण अर्ज केलेल्या योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे तातडीने महा-डीबीटी पोर्टलवर अपलोड करावेत गजर असल्यास कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.
डी.जी मुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड