लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे निर्गम उतारा मागणाऱ्या एका पालकास मुख्याध्यापिकेच्या मुलासह अन्य साथीदारांनी शनिवारी मारहण केल्याची घटना घडली होती. पालकाच्या फिर्यादीवरुन १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रमाकांत बलभीम ईटकर (४०, रा. नांदडी) असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव आहे. २० जून रोजी रमाकांत यांचा पुतण्या ओमकार व पुतणी अनुजा यांचा निर्गम उतारा मागण्यासाठी ईटकर हे जिल्हा परिषद शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापिका मंगल डोणे यांनी निर्गमचे रेकॉर्ड घरी असल्याचे सांगितले. दुसºया दिवशी ईटकर पुन्हा शाळेत गेले त्यावेळी ओमकार ऐवजी श्रीनिवास असे नाव असलेला निर्गम उतारा दिला. त्यानंतर हे नाव बदलून योग्य नाव टाकण्याची विनंती ईटकर यांनी केली. यावेळी डोणे व ईटकर यांच्यात शाब्दिक खटके उडाले होते. त्यावेळी सोमवारी निर्गम उतारा देते, असे मुख्याध्यापिकेने सांगितल्यावर ईटकर परत गेले. मात्र, शनिवारी ते दुकानात काम करत असताना डोणे यांचा मुलगा राजकुमार अंगद काळे हा साथीदारांसमवेत तेथे आला. त्याने ‘तुला निर्गम उतारा पाहिजे का?’असे म्हणत त्यांना मारहाण केली. यावेळी ईटकर यांच्या पत्नी सुनीता तेथे आल्या तेव्हा त्यांना देखील शिवीगाळ केली. या घटनेनंतर आक्रमक गावकऱ्यांनी राजकुमार काळेला खोलीत कोंडून ठेवले होते.शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी जाऊन काळे याची सुटका करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी रमाकांत ईटकर यांच्या फिर्यादीवरुन राजकुमार काळे, अक्षय डोणे, अविनाश लोमटे, महेश जोगदंड व इतर अनोळखी पाच ते सहा जणांविरुध्द ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुख्याध्यापिकेच्या मुलासह १० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:19 AM