दिंद्रुड ( बीड) : महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे 100% वीजबिल वसुली असूनही ऐन उन्हाळ्यात मागील १५ दिवसांपासून दिंद्रुडकर अंधारात आहेत. तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी महावितरण विरोधात मोर्चा काढत बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
दिंद्रुडच्या महावितरण कार्यालयात अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता कार्यरत नाही. यामुळे येथील कारभार पूर्णपणे ढासळला असून याचा फटका दिंद्रुडसह इतर चार ते पाच गावांना बसत आहे. येथील वीज पुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) व पवित्र रमजान महिना चालू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे, अशा काळात देखील अनेक वेळा निवेदन देऊनही येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.
यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी आक्रमक होत आज सकाळी (दि 14 ) दिंद्रुड येथून जाणाऱ्या बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आश्वासनानंतर आंदोलन मागे दरम्यान, महावितरणकडून आज चार सिंगल फेज रोहित्र दिंद्रुड गावासाठी देण्यात येतील, तसेच गावठाण फिडर साठी पुन्हा प्रस्ताव दाखल करणात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.