बीड : जिल्ह्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. एकूण २४२३ शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू झाले असून जवळपास ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
कोरोना आपत्तीमुळे चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास नऊ महिन्यांचा विलंब झाला. या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागात अनेक अडचणींमुळे थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पाेहोचले नाही. तर दुसरीकडे शहरी भागातील मुलांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही प्रणाली फारशी प्रभावी ठरू शकली नाही. दरम्यान, शासनाने कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांनुसार दक्षता घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. या वर्गांमध्ये दिवसेंदिवस उपस्थिती वाढत राहिली. तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शाळांकडूनही कोविडबाबत सर्व पातळीवर दक्षता घेण्यात येत आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता नियमित सुरू असून प्रसंगी तासिकांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न काही शाळांमधून सुरू आहे.
जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा १६५५
सुरू झालेल्या शाळा १६५५
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा ७६८
सुरू झालेल्या शाळा ७६८
विद्यार्थी संख्या
पाचवी ते आठवी २,०९,०८६
उपस्थिती १,१५,७९७
नववी ते बारावी १,६७,५०२
उपस्थिती १,०५,०००
शाळा सुरू झाल्यापासून एकही शिक्षक अथवा विद्यार्थी बाधित झालेला नाही. तसा अहवाल आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त पोहोचले आहे. पालकांनी कोरोनाला न घाबरता योग्य ती काळजी घेऊन आपल्या पाल्यांना पाठवण्यास हरकत नाही.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), जि प., बीड
----
शाळांमध्ये का वाढली उपस्थिती?
दहा महिने ऑनलाइन अभ्यासामुळे मुले घरी कंटाळली होती. त्यांच्या शंकांचे समाधान होत नव्हते. मोबाइलच्या अतिवापरामुळे ते एकलकोंडे बनत चालले होते. अलीकडच्या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांचे प्रमाणही कमी होत असल्याने पालकही समंजसपणे आणि दक्षता घेत विचार करू लागले आहेत. आता मुलांनाही मोकळे आणि स्वच्छंद वाटत असून शाळेत जाण्याचा उत्साह वाढला आहे. मोजक्या तासिकांमुळे का होईना शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा थेट संवाद होत आहे.
----
जिल्ह्यात एकही विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी बाधित नाही
२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्याआधी चार दिवसांपासून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. याच ९५९५ शिक्षकांपैकी १२८ शिक्षक बाधित आढळले. उपचारानंतर ते सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. उर्वरित शिक्षक शाळांवर कार्यरत असून शाळा सुरू झाल्यापासून एकही शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळलेले नाहीत.
-------
४० टक्के विद्यार्थी का अनुपस्थित?
जिल्ह्यातील बहुतांश ऊसतोडणी कामगार व इतर श्रमिकांनी रोजगारासाठी सध्या स्थलांतर केलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यांच्यासोबत अनेक पाल्य गेलेले आहेत. अद्याप ग्रामीण भागातून बसची सुविधा नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात येण्यास अडचणी आहेत. दुसरीकडे शहरातील पालक अद्यापही कोरोनाबाबत साशंक असून त्यांनी संमतीपत्र न दिल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्याचा परिणाम शाळांतील उपस्थितीवर झाल्याचे दिसून येत आहे.
----------