बीड : अन्न भेसळ सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यास दररोज शंभर रुपये दंड आकारला जात होता. याबाबतच्या नियमात सुधारणा करण्याची मागणी होती. दरम्यान आता परवाना नुतनीकरणासाठी पूर्वकल्पना देणारा संदेश मोबाईलवर पाठवला जाणार असून याची अंमलबजावणीही नुकतीच सुरु झाली आहे.
अन्न परवान्याचे नुतनीकरण वेळेत न झाल्यास प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. या शुल्काबाबत फेरविचार करुन नियमात बदल करावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत पवार यांना बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी नवी दिल्ली येथे भेटून दिले होते. यावेळी व्यापाऱ्यांना नुतनीकरण करण्याच्या एक महिना अगोदर मेसेजद्वारे अग्रीम सूचना दिली जाईल, यामुळे व्यापाऱ्यांना नाहक भुर्दंड लागणार नाही, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. या निर्णयाची देशभरात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आता परवाना नुतनीकरणासाठीचे मेसेज व्यापाऱ्यांना येत आहेत.
व्यापाऱ्यांनी वेळेत नुतनीकरण करावेआता प्रत्येक अन्न परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज तपासणे गरजेचे आहे. ज्यांना अन्न परवाना नुतनीकरण करणे गरजेचे आहे, त्यांना नुतनीकरणाचा संदेश AX-EFSSAI वरुन येणार आहे. हा परवाना वेळेत नुतनीकरण केल्यास दंड द्यावा लागणार नाही. या प्रश्नावर पाठपुराव्यासाठी आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी संहकार्य केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तातडीने प्रश्न सोडवला, असे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले.