आष्टी : तालुक्यातील १८९ पैकी १०८ गावांना कोरोनाने घेरले असून ८१ गावांनी आतापर्यंत कोरोनाला राेखले आहे. सध्या दोन कोविड सेंटरवर २७२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत गेल्यास ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती आहे.
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाने विळखा घातला असून आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाअभावी रुग्णांचे हाल होऊन जीव जायला सुरुवात झाली आहे. येथील कोविड सेंटरमध्ये सध्या ऑक्सिजन ४४ सिलिंडर असून ५ व्हेंटिलेटर चालू आहेत. तालुक्यातील १०८ गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उर्वरित ८१ गावात अद्यापपर्यंत रूग्ण आढळून आले नाही, अशी माहिती तालुका आरोग्य कार्यालयातील आरोग्य सहाय्यक शंकर वाळके यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलाव सुरू असून दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचारी नसल्याने त्याचा विपरीत परिणाम दाखल असलेल्या रुग्णांवर होत आहे. तालुक्यातील कडा, खुंटेफळ, टाकळसिग, धामणगाव, सुलेमान देवळा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्टिंगची सुविधा उपलब्ध आहे.
प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे
आष्टी येथील कोविड सेंटरवर सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवड्याबाबत जिल्हा प्रशासन या बाबींकडे लक्ष देऊन पूर्तता करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असले तरीही प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे.
भविष्यात रूग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक तथा कोविड सेंटर प्रमुख डॉ. राहुल टेकाडे यांनी केले.