गेवराई : तालुक्यातील कोल्हेर येथील ट्रान्सफार्मर जळाला असल्याने, ९ दिवसांपासून ११ गावे अंधारात आहेत. वीज नसल्याने शेती पाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याबाबत नागरिकांंनी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तातडीने विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, तत्काळ ट्रान्सफार्मर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हेर येथील ट्रान्सफार्मर गेल्या ९ दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यामुळे या ट्रान्सफार्मरवरून विद्युत पुरवठा करण्यात येत असलेल्या कोल्हेर, रेवकी, देवकी, मिरगाव, अर्धमसला आदी अकरा गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. लाइट नसल्याने पिण्यास व शेतीला पाणी नाही. त्यासोबतच गावातील पिठाची गिरणी व बोअरही बंद पडले आहे. कोरोनाच्या महामारीत ग्रामस्थांंना रात्र अंधारात काढावी लागत आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी स्थानिक विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधून ट्रान्सफार्मर बसविण्याची विनंती केली, परंतु याकडे गांभीर्याने लक्ष न देता, आठ दिवसांत ट्रान्सफॉर्मर बसवू, असे सांगितले.