- नितीन कांबळेकडा (बीड) : बालविवाह रोखले जावेत यासाठी सरकारने कडक कायदे केले असताना कायद्याला झुगारून बालविवाह होताना दिसत आहेत. ११ वर्षाची नवरी अन् १३ वर्षाच्या नवरदेवाचा असाच एक बालविवाह हळदी समारंभात झाल्याचे आष्टी तालुक्यात समोर आले आहे. या प्रकरणी चार जणांवर २ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आष्टी शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात मागील १९ आक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आईने ११ वर्षाच्या मुलीचा विवाह करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील देवळाली येथील १३ वर्षीय मुलासोबत हळदी समारंभात लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार २१ आक्टोबर रोजी समोर आला आहे. खुद्द आईनेचे हा विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकाराला वाचा फोडली. पोलिस अधीक्षक, आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन विवाह झाल्याची तक्रार दाखल केली.त्यानंतर ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके याच्या फिर्यादीवरून २ नोव्हेंबर रोजी सुशिला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन नवरी बालगृहातधक्कादायक प्रकार समजताच महिला बालहक्क समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, चाईल्ड लाईनच्या आश्विनी जगताप, बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी पुढाकार घेत अल्पवयीन नवरीला बीड येथील बालगृहात दाखल केले.
गावस्तरावरील बाल संरक्षण समित्या नावालाच!जिल्हाभरातील ग्रामबाल संरक्षण समिती नावालाच असून बालविवाह थांबवण्यास कसलाच पुढाकार घेतला जात नाही.यापुढे जर गावस्तरावर बालविवाह झाला तर समितीला दोषी धरून योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.