अंबाजोगाई (बीड ) : जीभेखाली आलेली गाठ शस्त्रकीया करून काढावी लागणार असल्याची डॉक्टर आणि वडिल यांच्यातील चर्चा ११ वर्षीय बालिकेने ऐकली. त्यानंतर संभाव्य शस्त्रक्रियेला घाबरलेल्या त्या बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील परळीवेस भागात उघडकीस आली.
प्रिया सुभाष लोंढे (वय ११, रा. शाहूनगर, परळीवेस, अंबाजोगाई) असे त्या बालिकेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रियाच्या जिभेखाली गाठ आली होती. त्यामुळे तिचे वडील तिला घेऊन रुग्णालयात गेले होते. तिला तपासल्यानंतर डॉक्टरांनी ती गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल असे तिच्या वडिलांना सांगितले. डॉक्टर वडिलांमधील संभाषण प्रियाने ऐकले होते. आता आपल्यावर शस्त्रक्रिया होणार याची कल्पनेने ती घाबरली होती. या भीतीपोटी तिने सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेतला. हे पाहून तिच्या आईने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी पोकॉ. अभंग यांच्या पंचनाम्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.