बीड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षा न देताच जिल्ह्यातील ११०० विद्यार्थी पास झाले आहेत. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असले तरी बहुतांश पालक नाराजी दर्शवित आहेत. मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च करून वर्षाच्या शेवटी परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी मार्चपासून देशात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला. ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाली; मात्र अनेक ठिकाणी ही प्रणाली दिखाऊच राहिली, तर काही ठिकाणी सुरळीत राबवता आली; परंतु जेमतेम परिस्थिती व तांत्रिक अडचणींमुळे अनेक मुलांचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकला नाही. शाळेची फीस, इतर पूरक शैक्षणिक बाबींवरील खर्च पालकांनी पेलला. फेब्रुवारीमध्ये सीबीएसईने नव्या नियमानुसार यंदा दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नाही, असे सूचित केले होते; मात्र विद्यार्थ्यांची क्षमता, पालकांचे स्वप्न, बौद्धिक कुवत विकसित कशी होणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. यातच एप्रिलमध्ये केंद्रीय बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुणदान समपातळीवर कसे आणणार?
सीबीएसई बोर्डामार्फतच मूल्यांकनाचे मापदंड तयार करण्यात येणार आहेत. त्या आधारे सीबीएसई दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांची ही पहिलीच परीक्षा असते. अंतर्गत मूल्यमापन, शाळेतच परीक्षा घ्याव्यात, असे पर्याय पुढे आले तरी सर्वच बोर्डात गुणदान पद्धत समपातळीवर कशी आणणार, असा प्रश्न आहे. कारण दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांची ग्रहण करण्याची क्षमता कशा तपासणार?
----------
पालक काय म्हणतात?
परीक्षा व्हायला पाहिजे. मूल्यांकन कसे करणार ? हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. अभ्यास करून मेहनत वाया जाते, अशी भावना बनत असल्याने मुले नैराश्यात जातात. त्यामुळे सुटी मिळूनही मुले आनंदी नाहीत. -- अंजली रेड्डी, अंबाजोगाई.
-----------
हा निर्णय योग्य नाही. ऑफलाइन परीक्षा व्हायला हव्यात. परीक्षेचे उद्दिष्ट नसेल तर भविष्यात त्यांचा आत्मविश्वास डळमळून जाईल. काळजी घेऊन सगळं काही सुरू आहे तर परीक्षेला काय हरकत होती. होम सेंटरला घेता आल्या असत्या. - कमलेश कासट, बीड.
---------
कोविडमुळे परीक्षा रद्द झाल्या ते योग्य असले तरी परीक्षा रद्द न करता उशिरा का होईना परीक्षा घ्यायला पाहिजे. शाळा फीस, स्कूल बस, गणवेश व इतर बाबींवर खर्च करूनही परीक्षा नसल्याने अभ्यासू मुलांचे नुकसान झाले आहे. - हनुमंत डाके, माजलगाव.
---------
पुढचे प्रवेश कसे होणार?
अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक शिक्षणासाठी सरसकट प्रवेश महाविद्यालयांना द्यावे लागतील. त्याचबरोबर प्रवेशासाठी स्वतंत्र ऑनलाइन परीक्षा हा पर्याय असू शकतो. यासंदर्भात शासनाकडून सूचना, मार्गदर्शन अपेक्षित आहे.
---------
सीबीएसई दहावीच्या शाळा १२
मुले ५६०
मुली ५४०
विद्यार्थी ११००
----------