बीड : आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना चालताना अनंत अडचणी आल्या. १२० वारकऱ्यांना तर हृदयाचा झटका आला. परंतु, आरोग्य विभागातील देवमाणूस धावले आणि त्यांचे प्राण वाचले. जवळपास १५ दिवस आरोग्य विभागातील सात हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी ‘रुग्णसेवा हीच इश्वरसेवा’ समजून परिश्रम घेतले. या वारीच्या काळात आरोग्य विभागाने तब्बल १४ लाख ६९ हजार वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली. या सर्वांच्या मदतीला आराेग्य विभागातील ‘पांडुरंग’ धावल्याचे दिसून आले.
आरोग्य विभागाकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ही मोहीम सलग दुसऱ्या वर्षी राबविली गेली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास एक हजार दिंड्या पंढरीच्या दिशेने जातात. यामध्ये लाखो भाविक सहभागी असतात. त्यांना रस्त्यात आरोग्याविषयी काही त्रास जाणवला की, लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला होता. तसेच ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी नियुक्त केले होते. त्यांना अत्यावश्यकसह प्रथमोपचार सेवा देण्यात आल्या. तसेच पंढरपूर येथील विशेष शिबिरातही उपचार करण्यात आले.
६३५ जणांना कुत्रा तर ४६ जणांना सापाने घेतला चावावारकरी मुक्कामाच्या ठिकाणी अथवा इतरवेळी मिळेल त्याठिकाणी आराम करत असत. याच ठिकाणी ४६ वारकऱ्यांना सापाने चावा घेतला. तसेच ६३५ वारकऱ्यांना कुत्रा चावला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
महाआरोग्य शिबिरात पावणे पाच लाख रुग्णांवर उपचारपंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४ लाख ८८ हजार ९०८ वारकरी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली. यासाठी ३ हजार ७१२ एवढे मनुष्यबळ नियुक्त केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, नोडल अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केले.
या मोहिमेत १४ लाख ६९ हजार वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. हार्ट अटॅकसह इतर गंभीर आजारांच्या १२७० रुग्णांना इमर्जन्सी सेवा दिली. सर्व टीमने यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळेच हे शिबिर यशस्वी झाले. आमचाच मागील वर्षीचा विक्रम मोडीत काढला.- डॉ. आर. बी. पवार, नोडल अधिकारी तथा सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे
---कोणत्या आजाराचे किती रूग्णओपीडी १४६९६५०आयपीडी ७७०७रेफर ४४१आयएलआय ३०२८३सारी ७८७अतिसार २१४५४हगवण ८६९८ताप ५०९५८हार्ट अटॅक १२०रस्ता अपघात ३७८कुत्रा चावला ६३५साप चावला ४६इतर १३५६२९१
कोणाला दम लागला तर कोणाला हृदयविकाराचा झटकाराधाकिशन राजाभाऊ गवळी (वय ६५, रा. झाडगाव, जि. जालना) यांना पत्राशेड परिसरातील दर्शन रांगेत दम लागला. श्वास घेण्यास त्रास होऊन हृदयाचे ठोके वाढले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. माणिक शंकर बारवकर (वय ५५, रा. घनसावंगी, जि. जालना) यांना छातीत दुखून घाम आला. यावेळी तपासणीअंती त्यांना उच्च रक्तदाब (२३०/११०) असल्याचे निदान झाले. ईसीजी केल्यावर तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यांना उपचार करून स्थिर केले. कैसाबाई आसाराम गोरे (वय ८०, रा. सोळेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना अचानक झटका आला. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. अशा अनेक वारकरी रुग्णांवर तातडीने उपचार करून आरोग्य विभागातील देवमाणसांनी त्यांना एकप्रकारे जीवदान दिले आहे.