लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली असून हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे. आॅनलाईन माहिती भरण्यासाठी ३१ जानेवारी अंतीम दिवस असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती भरण्यासाठी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे.शाळांचे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने स्वयंमूल्यमापन करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. स्वयंमूल्यमापनानंतर त्याची विभागीय व राज्य पातळीवर मूल्यमापन केले जाते. त्यावरून शाळांची श्रेणी निश्चित करण्याची ही पध्दत आहे. यासाठी शाळा मानके व मूल्यांकनाचा आराखडा निश्चित करुन दिलेला आहे. शाळेतील अध्यापन कसे आहे? अध्ययन मूल्यांकन, शाळेची प्रगती, विकास, शाळा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन आदी कामातून शाळांमध्ये सुधारणा व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.आपल्या शाळेचा आवार, क्रीडांगण व उपकरणे, वर्गखोल्या, विद्युत सुविधा, विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक सुविधा, रॅम्प, मध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली, भांडी, पाणी, स्वच्छतागृह इ. सुविधांबाबत स्वत: मूल्यांकन करुन आपण कोणत्या पातळीवर आहोत, हे ठरविण्यात येत आहे.शाळासिद्धी उपक्रमात जिल्हयातील शाळांनी ३० जानेवारीपर्यंत आॅनलाईन माहिती भरणे आवश्यक होते. बीड जिल्ह्यात ३७१० शाळा असून ३३ टक्के शाळांनी शाळासिद्धीकडे पाठ फिरविली आहे. तर १५ टक्के शाळा ही माहिती भरण्याच्या प्रक्रियेत वयस्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
शाळासिद्धीकडे बीड जिल्ह्यात १२०० शाळांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:24 AM