अंबाजोगाई : ‘हरित अंबाजोगाई’तर्फे अंबाजोगाई शहरातील झाडांच्या सर्वेक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. अतिशय अवघड असलेले हे काम या टीमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांत पूर्ण केले. अंबेजोगाईतील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मस्जिदी, चर्च, मठ, स्मशानभूमी, कब्रस्थान व शासकीय कार्यालये या ठिकाणच्या झाडांची नोंद या सर्वेक्षणात घेण्यात आली.
‘पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून या सर्वेक्षणाचा अहवाल अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना ग्रुपच्या वतीने डॉ. शुभदा लोहिया यांनी सुपूर्द केला.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने तयार होणाऱ्या घनवन प्रकल्पात हरित अंबेजोगाईच्या सदस्यांनीही काही झाडे लावली. वृक्ष सर्वेक्षणाच्या या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाबद्दल अपर जिल्हाधिकाऱ्यांनीही उत्सुकता दाखविली व या प्रकल्पाचे कौतुक केले.
या वृक्ष सर्वेक्षणात कमलेश परधडिया, अनंत मलवाड, गणेश वेदपाठक, विशाल जगताप, पायल भुतडा, शैलजा पवार, रेणुका गिरवलकर, अनुष्का लोहिया, गुरुदत्त तिवारी, दीपाली माहूरकर, अजिंक्य कुलकर्णी व इतरही बऱ्याच जणांनी सहभाग नोंदविला. या संपूर्ण सर्वेक्षणाला प्रा. अभिजित लोहिया, प्रा. डॉ. कल्याण सावंत, प्रा. गिरीश कुलकर्णी, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष मांडले गेले त्यावर नक्कीच विचार केला जाईल व त्याचा उपयोग पुढील काळात अंबाजोगाईमध्ये होणाऱ्या वृक्षलागवडीच्या वेळी केला जाईल, असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी दिले.
सर्वेक्षणातील माहिती नोंदविलेले निरीक्षण
१) अंबाजोगाईमध्ये एकूण १२५ प्रकारच्या विविध जातींचे वृक्ष आहेत.
२) घनवन प्रकल्पात लावलेले वृक्ष सोडून पाच फुटांच्या वरचे साधारण २१ हजार १७० वृक्ष सध्या अस्तित्वात आहेत. ३) सप्तपर्णी, पाम, सुबाभूळ या झाडांची संख्या खूप जास्त आहेत. त्यामुळे यापुढे झाडे लावताना शक्यतो ही झाडे न लावता हीवर, धावडा, काटेसावर, वावळ, हिरडा, बेहडा, अंजन, कांचन, आदी प्रकारची झाडे लावणे आवश्यक आहे.
४) पांगारा, रुक्मिणी, मोहगनी, पिल्लू, बर्मा, दुरंगी बाभूळ, कांचन, पळस, काळा कुडा, नांदुरकी, धामण, शिवण, रिठा, कवठ, बहावा, ताम्हण, तुती या वृक्षांची संख्या खूपच कमी आहेत. यापुढे हे वृक्ष लावणे अत्यंत आवश्यक आहे. ५) सार्वजनिक बागांमध्ये व सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये बऱ्याच ठिकाणी सारख्याच प्रकारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. यापुढे अशा ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लावणे आवश्यक आहे, असे निरीक्षण या सर्वेक्षणातून निदर्शनास आले.
===Photopath===
050621\avinash mudegaonkar_img-20210605-wa0069_14.jpg