पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील बाजार समिती अंतर्गत यावर्षी १३९ कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२६ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मागील वर्षी याच बाजार समिती अंतर्गत २६४ कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला होता. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक हातचे गेल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस उत्पादकांचे निम्याने उत्पन्न कमी झाले आहे.
मराठवाड्यात कापसाचे भांडार म्हणून माजलगाव तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी पंचवीस ते तीस टक्के क्षेत्रात कापसाची लागवड होते. चालू हंगामात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने कापसाचे पीक जोमात आले होते. परंतु, परतीच्या पावसाने जोर लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कापसाचे लवकरच झाडे होऊन एक-दोन वेचण्या होताच शेतकऱ्यांवर कापूस मोडण्याची वेळ आली. यामुळे उत्पादनात निम्याने घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चदेखील निघू शकला नाही.
यावर्षी आतापर्यंत ७ जिनिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी करण्यात आली होती. या जिनिंगवर २ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याद्वारे शेतकऱ्यांना १३८ कोटी ६० लाख रुपये मिळाले. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला ५ हजार ५०० रुपये ते ५ हजार ७२५ रुपये भाव मिळाला. यावर्षी जानेवारीमध्येच १० टक्के शेतकरी वगळता सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला, तर गतवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतरही कापसाची खरेदी सुरूच होती. गतवर्षी ५११० ते ५५०० या भावाने ५ लाख ५२ हजार ६८३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना २६४ कोटी ४९ लाख ८५ हजार ६४५ रुपये मिळू शकले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला भावही जास्त होता. परंतु, शेवटच्या टप्प्यात पाऊस जास्त पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. त्यामुळे तुलनेत यावर्षी कापसाचे उत्पादन निम्याने घटल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ व सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली.
यंदा झाली निम्मी खरेदी
यावर्षी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर १ लाख ६२ हजार क्विंटल, तर खासगी जिनिंगवर १ लाख १० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, तर गतवर्षी शासकीय खरेदी केंद्रावर ३ लाख ६९ हजार ८३७ क्विंटल तर खासगी खरेदी केंद्रांवर १ लाख ८२ हजार ८४६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.