बीड : अभ्यास न करता २० हजार रुपये देऊन बीडमधील एका उमेदवाराने छत्रपती संभाजीनगरच्या मित्राला पोलिस शिपायाच्या लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार म्हणून पाठविले. त्याच्यासोबत ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्टर, इअर बड्स आदी साहित्यही दिले; परंतु पोलिसांच्या तपासणीत हे सर्व उघड झाले. ठाणे पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करून दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या कृत्याने बीडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
बालाजी बाबू कुसळकर (३० रा. बीड) हा उमेदवार असून विकास अंबरसिंग जौनवाल (२४, रा. बेंबळ्याची वाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) हा डमी परीक्षार्थी आहे. बालाजी याची ठाणे पोलिस आयुक्तालयात पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा रविवारी होती. परंतु स्वत: परीक्षेसाठी न जाता त्याने आपला मित्र विकासला पाठविले. मेन गेटवर तपासणी करत असतानाच पोलिसांना त्याच्यावर संशय आला. तपासणी केली असता, त्याच्या डाव्या पायातील निकॅपमध्ये ब्लूटुथ डिव्हाइस कनेक्टर व त्यामध्ये दोन सिम कार्ड आढळले. त्याच्याजवळील प्रवेशपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड तपासले असता ते बालाजीच्या नावाचे निघाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले; परंतु बालाजीने तेथून पळ काढला.
२० हजारांत मदत, १० हजार रोख दिलेडमी उमेदवार बनून जाण्यासाठी बालाजीने विकासला २० हजार रुपये देण्याचे ठरवले होते. केंद्रात जाण्याच्या अगोदर १० हजार रुपये रोख दिले होते तर काम झाल्यानंतर उर्वरित १० हजार रुपये दिले जाणार होते. विकास पायातील ब्लूटुथ डिव्हाइसच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून बालाजीला पाठविणार होता. त्याचे उत्तर शोधून बालाजी त्याला फोनवरून सांगणार होता. त्यासाठी कानात ब्लूटुथही घातले होते.
विकास बारावी नापास?बालाजीने डमी परीक्षार्थी पाठविलेला विकास हा बारावी नापास असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याचा केवळ आतील प्रश्न पत्रिकांचे फोटो बाहेर पाठविण्यासाठी उपयोग केला जाणार होता.