बीड : जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे. या सर्व कामचुकारांचे वेतन कपात करण्यात आले आहे. काही मुजोर डॉक्टर आजही रूग्णांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.जिल्हा रूग्णालयात शरीक (अॅडमिट) असलेल्या रूग्णांची तपासणी सकाळी १० वाजेपर्यंत तर सायंकाळी ६ करणे अपेक्षित आहे. मात्र, काही डॉक्टर वॉर्डमध्ये जावून रूग्णांची तपासणीच करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर मागील तीन दिवसांपासून स्वता: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली असता सोमवारपर्यंत १३ डॉक्टरांनी राऊंड घेतला नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर तात्काळ वेतन कपातीची कारवाई झाली.दरम्यान, यातील पाच ते सहा डॉक्टर हे नेहमीच कामचुकारपणा करीत असल्याचे समोर आलेले आहे. त्यांच्यावर कारवाई करूनही सुधारणा होत नसल्याचे सांगितले. याचा परिणाम सेवेवर होत असून रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा कामचुकार डॉक्टरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी रूग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.दलालांमार्फत रूग्णांची पळवापळवीकारवाई झालेल्या १३ पैकी जवळपास १० डॉक्टरांचे खाजगी रूग्णालये आहेत. जिल्हा रूग्णालयातील रूग्णांकडे दुर्लक्ष करून खाजगी रूग्णालयात आलेल्या रूग्णांवर ते उपचार करतात. काही डॉक्टरांकडून येथील रूग्णांची दलालांमार्फत पळवापळव होत असल्याचे समोर आले आहे.हे दलाल रूग्णांच्या मनात भिती घालून त्यांना बाहेर नेत असल्याचे मागील काही प्रकरणातून समोर आले होते. हे प्रकार बंद करून सरकारी रूग्णालयातच उपचार करावेत, अशी मागणीही सर्वसामान्यांमधून होतआहे.
१३ कामचुकार डॉक्टरांचे वेतन कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:04 AM
जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे.
ठळक मुद्देकारवाई : रूग्णांची वेळेवर तपासणी न करणे अंगलट