बीड : १३ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार घेतले. याचदरम्यान नाकात आतून सूज आली तसेच डोळेही सुजले. नातेवाईकांनी डॉक्टरांना उपचारासाठी विनंती केली, परंतु, कोणीच दखल घेतली नाही. अखेर खासगीत तपासणी केल्यावर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यावर म्युकरमायकोसिसचे लक्षणे दिसली. त्यामुळे बुधवारी संबंधित रुग्णाला अंबाजोगाईला रेफर करण्यात आले. हा सर्व प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला.
बीड तालुक्यातील लिंबारूई येथील ३३ वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. कोरोनाचे उपचार सुरू असतानाच त्याला डोके दुखणे, डोळ्याला व नाकाला त्रास होत होता. नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह इतर डॉक्टरांना उपचारासाठी विनंती केली. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. १३ दिवस झाल्याने हा त्रास वाढला. अखेर बुधवारी नातेवाईकांनीच खासगी वैद्यकीय तज्ज्ञांच सल्ला घेत एमआरआय केला. यात सर्व म्युकरमायकोसिसचे लक्षणे दिसली. त्यामुळे तात्काळ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी रेफर लेटर घेऊन रुग्ण हलविण्यात आला. यानिमित्ताने रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षपणाचा आणखी प्रकार समोर आला असून, संताप व्यक्त होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता.
एक बोट दाखविले, तर दिसतात दोन बोटे
अगोदर ठणठणीत असलेला हा रुग्ण बुधवारी चांगलाच घाबरला होता. डोळ्याला सूज असल्याने त्याची नजरही कमी झाली आहे. तसेच एक बोट दाखवले असता दोन बोटे दिसत असल्याचे सांगण्यात आले. तसेच नाकातही जास्त त्रास होत असल्याचे रुग्ण सांगतो.
१३ दिवसांपासून रुग्ण दाखल आहे, डोके दुखत आहे, डोळ्याला आणि नाकात त्रास होत असल्याचे सीएस, एसीएस यांना वारंवार सांगितले. त्यांनी दुर्लक्ष केल्याने एमआरआय केला. यात म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली. त्यामुळे आता अंबाजोगाईला रेफर केले आहे. उपचाराकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णाला त्रास सहन करावा लागत आहे. आता मी स्वत: त्याला अंबाजोगाईला घेऊन आलो आहे.
शाहेद पटेल, सामाजिक कार्यकर्ते, बीड