सोमनाथ खताळ, बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले व जिल्ह्यात तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नऊ पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक असे १३ अधिकारी बदलून गेले आहेत, तर त्यांच्या जागी नवे १५ अधिकारी मिळाले आहेत.
पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम धाराशिवला बदलून गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस अधिकाऱ्यांच्या ३१ जानेवारीपर्यंत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार ज्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि जे जिल्ह्यातील रहिवासी आहेत, अशांचा समावेश होता. परंतु, या बदल्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर नव्याने यादी मागविली होती. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांना अहवाल दिला होता.
दोन पीआय, दोन एपीआय बदलले
बीडमधील पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम यांची धाराशिवला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन पीआय अद्याप आले नाहीत, ते दोघेही नियंत्रण कक्षात होते. तसेच सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब व नारायण गित्ते यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या जागी त्याच जिल्ह्यातून विलास मोरे व संदीप पाटील हे बीडला आले आहेत.
हे पीएसआय बीडला आले, हे गेले
पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, भास्कर शंकर कांबळे, तुकाराम रघुनाथ बोडखे, शिवशंकर बळीराम चोपणे, देविदास बाजीराव आवारे यांची धाराशिव जिल्ह्यात बदली झाली आहे. तर ज्ञानेश्वर दत्तात्रय राडकर, चेतन वसंतराव ओगले, भागवतराव विश्वजित फरतडे, उत्तम संभाजी नागरगोजे यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधून देवीदास बाबूअप्पा खांडकुळे, योगेश गोविंद पवार, स्वाती नाना लहाणे, प्रभाकर आसाराम मुंजाळ, संजय मुरलीधर धुमाळ हे बीडला आले आहेत. तर धाराशिववरून बसवेश्वर रामचंद्र चेनशेट्टी, रमाकांत मोहनराव शिंदे, भागवत यशवंत गाडे, सुकुमार गणपत बनसोडे, अनघा अंकुश गोडगे, शिवाजी रणबाग सर्जे, रियाज करिमखान पटेल, पल्लवी संजय पवार बीडला आले आहेत.